
मालेगाव । प्रतिनिधी Malegaon
राज्यात केशरी शिधापत्रिकाधारक गोरगरीब जनतेस स्वस्त धान्य मिळत असताना मालेगाव शहरातील लाखावर मोलमजुरी करणारे गरीब या धान्याच्या लाभापासून वंचित राहत आहेत. प्रशासन यंत्रणेने हा अन्याय त्वरित थांबवावा यासंदर्भात जिल्हाधिकार्यांना स्पष्ट निर्देश देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी यासंदर्भात येत्या चार दिवसांत तोडगा न निघाल्यास नागपूर अधिवेशनात या प्रश्नावर आपण स्वत: आवाज उठवू, अशी ग्वाही शिष्टमंडळास दिली.
शहरातील 59 हजारांपेक्षा कमी उत्पन्न असलेल्या दारिद्य्ररेषेखालील गोरगरीब जनतेस केशरी कार्डावर शिधावाटप दुकानातून धान्य दिले जात नाही. त्यामुळे मोलमजुरी करणार्यांवर उपासमारीचे संकट आले आहे. राज्यात अन्य शहरांत केशरी कार्डधारकांना शासनाचे धान्य मिळते मात्र मालेगावी पूर्व भागातील गोरगरिबांना हे धान्य दिले जात नाही. पुरवठा अधिकार्यांसह प्रांत, तहसीलदारांकडे यासंदर्भात तक्रारी केल्यास लक्ष दिले जात नाही.
गत अनेक वर्षांपासून स्वस्त धान्याची ही अनागोंदी शहरात पुरवठा विभागातर्फे सुरू आहे. यासंदर्भात चार दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे विराट मोर्चा अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला होता. या मोर्चाची दखल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी घेतली. मुंबई येथे राष्ट्रवादीचे माजी आमदार शेख रशीद, आसिफ शेख यांच्यासह पदाधिकार्यांना पाचारण करत माहिती घेतली.
राज्यात सर्वत्र केशरी कार्डधारकांना धान्य मिळते मात्र मालेगाव शहरातील 1 लाख 20 हजारापेक्षा मोलमजुरी करणारे विशेषत: दारिद्य्ररेषेखालील गोरगरीब शासनाच्या या धान्यापासून वंचित राहत आहेत. ग्रामीण भागात धान्य दिले जाते परंतु शहरात दिले जात नाही. दुकानांची संख्या कमी असताना ती वाढवली जात नाही. धान्य दिले जाते परंतु पावती दिली जात नाही. गोरगरिबांसाठी असलेले धान्य, डाळ, साखर, तांदूळ गायब होत आहे. मात्र या अन्यायाबद्दल तक्रार केल्यास पुरवठा अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने हजारो महिलांच्या उपस्थितीत मोर्चा काढला.
यासंदर्भात निर्णय न झाल्यास 25 डिसेंबरला हजारो मोलमजुरी करणार्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयास घेराव घालणार असल्याची माहिती माजी आमदार शेख रशीद यांनी पवार यांना दिली. या तक्रारीची त्वरित दखल घेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करत याप्रश्नी त्वरित बैठक घेऊन तोडगा काढण्याचे निर्देश दिले. राज्यात सर्वत्र केशरी कार्डधारकांना धान्य मिळत असताना मालेगाववासियांना का दिले जात नाही? याप्रश्नी प्रशासन यंत्रणेने त्वरित तोडगा न काढल्यास नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विधानसभेत आपण आवाज उठवू, असे आश्वासन पवार यांनी शिष्टमंडळास दिल्याची माहिती शेख रशीद यांनी दिली.