नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

पंतप्रधान मोदी यांनी संसदेत शेतकरी कायद्यांवर बोलतांना हमी भाव होता आणी राहील असे सांगितले. त्यांच्या या विधानाच स्वागत आहे. शेतकऱ्यांना पण तेच हवे आहे. मात्र,आश्वासन देणं आणी कायदा करणे या स्वतंत्र गोष्टी आहे. केंद्र सरकारने हमीभावाबाबत कायदा करावा अशी मागणी अन्न पुरवठा मंत्री तथा पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि. ८) झालेल्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. पंतप्रधान मोदी यांनी हमी भावाचे आश्वासन दिले याबाबत विचारले असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. केंद्र सरकारने कायद्याला दिलेलि स्थगिती केव्हाही उठू शकते.

त्यामुळे मोदी सरकारने हा कायदा रद्द करून नवा कायदा करावा.शेती हा विषय केंद्र आणी राज्य दोघांचाही आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांसह शेतकरी संघटनांसोबत चर्चा करावी, अशी मागणी त्यांनी केली.

राज्य सरकारकडून केल्या जात असलेल्या नामांतरावरुन भाजपला चिमटा काढत जलयुक्त शिवार योजनेचे नाव मुख्यमंत्री जलसंवर्धन शिवार झालं तर काय बिघडल. सगळी नावं तुम्हीच बदलली. नावं बदलण्याचा पायंडा तुम्ही पाडला. तो आम्ही चालवतो. वीस वर्षांनी तुमचा मुख्यमंत्री झाला की तुम्ही परत नावे बदला, असा टोला त्यांनी लगावला.

उत्तराखंड दुर्घटना धक्कादायक

उत्तराखंड येथील घटना धक्कादायक आहे. विकास करतांना पर्यावरण हानी आपल्याकडून होते. काळजी घेण्याची आवश्यकता आहे. हिमनग कोसळायला लागले ही चिंतेची बाब आहे. आपण थांबायचं कुठे हे ठरवायला हवे असे ते म्हणाले.

अनधिकृत पोस्टर्सवर कारवाइ व्हावी

शहर परिसरात कोणत्याही नेत्याच्या स्वागतासाठी लागणारे अनधिकृत पोस्टर्सवर कारवाई व्हायला हवी.शहराला विद्रूप करण्याचं काम कोणीही करायला नको. राष्ट्रवादी सह सर्व पक्षांनी अनधिकृत पोस्टर्स लावू नये. पालिका आयुक्तांनी कारवाई करावी, असे त्यांनी सांगितले.