वावी । Vavi (वार्ताहर)

शिर्डी येथे सुरु असलेल्या 17 वर्षाखालील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेत वावीच्या संघाने औरंगाबाद संघाचा अटीतटीच्या लढतीत 3 धावांनी पराभव करुन विजयी सलामी दिली. वावीच्या संघाने प्रथमच लेदर बॉलवर सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेत भाग घेतला.

कोपरगाव येथील सुदर्शन क्रिकेट अॅकेडमीच्यावतीने आयोजित या स्पर्धेत नाशिक, मुंबई, पुणे, शिर्डी, संगमनेर, सिन्नर, श्रीरामपूर, मालेगाव, नेवासा, कोपरगाव, पुणतांबा, वावी आणि औरंगाबाद येथील दोन संघांनी भाग घेतला आहे. सन 2009 पासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. रविवारी सकाळी सलामीची लढत वावी आणि औरंगाबाद या दोन संघात झाली.

स्पर्धेचे उद्घाटन शिवसेना जिल्हा संघटक विजय काळे व नसीर खान पठाण यांच्या हस्ते करण्यात आले. या लेदर बॉल स्पर्धेचा वावी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

20 षटकात वावीच्या नवख्या संघाने 116 धावांपर्यंत मजल मारली. औरंगाबादचा कसलेला संघ सहज विजय मिळवेल असे वाटत असतांना वावीच्या गोलंदाजांनी अचूक गोलंदाजी करुन औरंगाबादच्या खेळाडूंना जेरीस आणले.

सामना शेवटच्या षटकापर्यंत लांबला. शेवटच्या षटकांत 7 धावांची गरज असतांना गौरव वर्माने या षटकात दोन फलंदाजांना बाद करीत अवघ्या तीन धाव दिल्या. त्यामुळे वावी संघांचा 3 धावांनी विजय झाला. संघ प्रशिक्षक मितेश जोंधळे याचे नवख्या खेळाडूंना मार्गदर्शन लाभले.

पार्थ पटेल, गौरव वर्मा, तन्मय नागरे, अभय पाटील, पुरोषात्तम जगताप, ओम पटेल, वरून केसकर, संस्कार कर्पे, प्रेम जाधव, सिद्धार्थ गायकवाड, अभिषेक पाबळे, तन्मय भुसे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळ केला. पहिल्याच सामन्यात विजय मिळविल्याबद्दल चिमुकल्या खेळाडूंचे कौतूक होत आहे.

संस्कारने वेधले लक्ष

वावीचा संस्कार कर्पे हा 12 वर्षांचा चिमुकला खेळाडू. त्याने औरंगाबाद संघाविरुध्द उत्तम गोलंदाजी करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेत सर्वांत लहान खेळाडून म्हणून त्याची नोंद झाली.