ओझे । वार्ताहर Dindori / Oze

दिंडारी तालुक्यात यंदा शेतकर्यांनी कलिंगड लागवडीला पंसती दिली आहे. मागील वर्षी करोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठावरही परिणाम होऊन कलिंगड उत्पादकानां मोठा फटका बसला होता.

अनेक शेतकर्यांना स्वतः रस्त्यावर बसून कलिंगड विक्री करावी लागली. तरी योग्य बाजार भाव न मिळाल्यामुळे शेतकरी वर्गाला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला होता, मात्र चालूवर्षी मागील हंगामात झालेला तोटा भरून काढण्यासाठी शेतकर्यांंनी पुन्हा कलिंगड लागवडीला पंसती दिल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

कलिंगड लागवडीसाठी शेतकर्यांनी नर्सरीतील रोपांना पंसती दिली आहे. कलिंगडाच्या एका रोपाची किंमत नर्सरीमध्ये तीन रुपये याप्रमाणे मिळत आहे. साधारणात: एका एकरासाठी अंदाजे सहा ते साडेसहा हजार रोप लागत असून 18 ते 19 हजाराचा नुसता रोपाचा खर्च येतो. त्यात मल्चिंग पेपर, ठिबक सिंचन त्याप्रमाणे लागवडीच्या वेळेस विविध प्रकारचे जैविक व रासायनिक खते वापरली जातात. कलिंगडाची लागवड करताना दोन रोपामधील अंतर साधारणपणे एक ते दिड फुट असून दोन सर्या मधील अंतर हे चार फुट असते. कलिंगड तयार होईपर्यंत एकरी 80 ते 90 हजार रुपये खर्च येतो.

कलिंगडाच्या एका वेलीवर जास्ती जास्त तीन फळाचे नियोजन करण्यात येते. शेतकरी कशा प्रकारे देखभाल करतात. त्यानुसार एका कलिंगडाच्या वेलीपासून साधारणपणे 13 ते 15 किलो माला तयार होत असतो. एका वेलीवर जास्त प्रमाणात कलिंगडाचे फळ धरल्यास वजनात घट येवून गुणवत्तेवर परिणाम होत असतो. यासाठी कलिंगड उत्पादक एका वेळीवर तीन पेक्षा जास्त फळ ठेवत नसल्याचे दिसून येत आहे. कलिंगडाच्या पिकांचे योग्य नियोजन करून रासायनिक, सेंद्रिय, विद्रव्य खते त्याप्रमाणे औषधाची फवारणी योग्य वेळेत केल्यास एकरी वीस ते पंचवीस टनापर्यत उत्पादन काढता येते. हे कलिंगड तयार झाल्यानंतर जागेवर 10 रुपये प्रतिकिलो भाव मिळल्यास उत्पादक शेतकर्यांना परवडत असल्याचे बोलले जाते अनेक शेतकर्यांनी नविन द्राक्ष बागेत कलिंगडाची लागवड केल्यांचे दिसून येत आहे.

नविन द्राक्षबागेत सुर्यप्रकाश चांगला मिळत असतो. व्यापारी मागणी नुसार शेतातूनच कलिंगडाची खरेदी करत असतात. मात्र मागील वर्षी करोनाची परिस्थिती असतानां अनेक शेतकर्यांना स्वताःहा अनेक फळाची विक्री करावी लागली आहे. त्यामुळे अनेक शेतकर्यांना मार्केटिंगचा अनुभव आला आहे. ज्या शेतकर्यांच्या कुटुंबात मनुष्यबळ असेल तर तो शेतकरी चांगल्या प्रकारे मोठ्या मोठ्या सोसायटी मध्ये आपला माला विकू शकतो अशी चर्चा शेतकर्यांमध्ये होताना दिसत आहे.