महापौरांच्या हस्ते गंगापूर धरणाचे विधीवत जलपुजन

नाशिककरांना दिलासा साठा 5304 द.ल.घ.फु.
गंगापूर धरण जलपूजन
गंगापूर धरण जलपूजन

नाशिक । Nashik

मराठवाड्यासह नाशिक जिल्ह्यातील काही भागांना आणि नाशिक शहराला संजीवनी ठरलेले गंगापूर धरण 94 टक्के भरले असुन गंगापूर समुहाचा एकुण साठा 73.44 टक्के इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज महापौर सतिश कुलकर्णी यांच्या हस्ते गंगापूर धरणातील पाण्याची विधिवत पुजन करण्यात येऊन धरणाला पुष्पहार -श्रीफळ व साडीचोळी अर्पण करण्यात आली.

महानगरपालिकेच्यावतीने गंगापूर धरणावर आज दुपारी जलपुजनाचा कार्यक्रमाचा कार्यक्रम झाला. याप्रसंगी महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, भाजपा पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते. याठिकाणी जलपुजन पुजाविधी करण्यात आल्यानंतर श्रीफळ - पुष्पहार व साडीचोळी धरणाला अर्पण करण्यात आला.

गंगापूर धरणातील जलसाठा 80 टक्क्याच्यावर गेल्यानंतर यापुर्वी जलपुजन केले जात होते. मात्र गेल्या वर्षी जलसाठा 97.10 टक्के इतका झाल्यानंतर जलपुजन करण्यात आले होते. यानंतर आज जलसाठा 94.21 टक्के इतका आहे. शहरातील वाढलेली लोकसंख्या लक्षात धरणातील अगोदर असलेले नाशिक महापालिकेचे आरक्षण वाढविण्याची गरज असुन यादृष्टीने महापालिका प्रशासनाकडुन प्रयत्न केले जात आहे.

दरम्यान गंगापूर धरणातील जलसाठा 94 टक्के झाला असला तरी समुहातील गौतमी 68.29 व कश्यपी धरणात 67.82 टक्के पाणी साठा आहे. एकुण गंगापूर समुहात सध्या 73.44 टक्के इतका साठा आहे. यामुळे नाशिककरांना समुहातील जलसाठी 95 टक्के भरण्याची प्रतिक्षा करावी लागणार आहे.

बहुतांशी नगरसेवक अनुपस्थित

गत वर्षी गंगापूर धरणावर झालेल्या जलपुजनास जवळपास सर्व पक्षीय 20 नगरसेवक व आयुक्तांसह बहुतांशी अधिकारी उपस्थित होते. आजच्या जलपुजनास केवळ महापौरांसह सात नगरसेवक हजर होते. तर अधिकारी देखील अल्पसंख्येने हजर होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक नगरसेवक अधिकार्‍यांनी जलपुजनास येण्याचे टाळले.

निसर्गाने नाशिकरांवर केली कृपा - महापौर

गेल्या महिन्यात नाशिककरांसाठी पाऊसाने चांगलीच ओढ दिली होती. आता मात्र निसर्गाने नाशिककरांवर कृपा केली असुन चांगला पाऊस झाल्याने धरण भरले आहे. आता अत्यंत चांगले वातावरण नाशिककरांसाठी निर्माण झाले आहे.

नाशिककरांचे पाणी कपातीचे संकट दूर - बोरस्ते

गंगापूर समुह धरणात गेल्या काही दिवसात पडत असलेल्या पाऊसाने समाधानकारक जलसाठा झाला आहे. यामुळे आता नाशिककरांच्या डोक्यावर असलेले पाणी कपातीचे संकट दूर झाले आहे, अशी प्रतिक्रीया विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com