पाणी योजनेची गावे तहानलेलीच

पाणी योजनेची गावे तहानलेलीच

सिन्नर। प्रतिनिधी | Sinnar

मनेगावसह (manegaon) 22 गाव पाणीपुरवठा योजनेच्या (Water supply scheme) नवीन पाईपलाईनच्या टेस्टिंगच्या नावाखाली सर्व गावांना होणारा पाणीपुरवठा (Water supply) बंद झाला असून टेस्टिंगच्या नावाखाली या गावांना वेठीस धरणे थांबवा अशी मागणी बाजार समितीचे माजी सभापती अरुण वाघ (Arun Wagh, former chairman of the market committee) यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केली आहे.

मनेगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेत नव्याने 6 गावांचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, या गावांसह योजनेतील सर्व गावांना पाणी पोहोचत नाही. योजनेची जुनी पाईपलाईन कुठलीही पूर्वसूचना न देता योजनेच्या समितीने बंद केली असून समृध्दी महामार्गाच्या क्रॉसिंगवर टाकलेल्या नव्या पाईपलाईनवरुन पाणीपुरवठा सुरु केला आहे.

नव्या पाईप लाईनची टेस्टिंग करुन सर्व गावांना सुरळीत पाणी पुरवठा होतो की नाही हे पाहून जुनी पाईपलाईन सुरू ठेवायची की बंद करायची याबाबतचा निर्णय घ्यायला हवा होता. मात्र, पाणीपुरवठा समितीने कोणालाही विश्वासात न घेता जुनी पाईपलाईन बंद केली व नव्या पाईपलाईनने पाणीपुरवठा सुरु केला आहे. हा पाणी पुरवठा सुरू असतानाच पाईप लाईनचे टेस्टिंगचेही काम सुरू असून योजनेचे पाणी नव्याने वाढवलेल्या गावांसह योजनेतल्या जुन्या गावांनाही पोहोचणे बंद झाले आहे.

केवळ योग्य नियोजन नसल्याने या गावांचा पाणी पुरवठा बंद झाला असून या गावांना वेठीस धरण्याचे काम समितीकडून सुरू आहे. योजनेतल्या भोकणीसह अनेक गावांनी आपल्याकडील पाणीपट्टीची (water tax) रक्कम यापूर्वीच भरली असून पूर्ण पाणीपट्टी भरल्यानंतरही या गावांना पाण्यापासून वंचित रहाण्याची वेळ आली आहे. या पाणीपुरवठा योजनेचे 50 टक्के वीजबिल (electricity bill) माफ करण्याचा प्रस्ताव पंचायत समितीच्या माध्यमातून शासनाकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर करून आणण्यासाठी पाणीपुरवठा समितीच्या पदाधिकार्‍यांनी पाठपुरावा करणे गरजेचे होते.

मात्र, त्यासाठी प्रयत्न न करता नव्या पाईप लाईनच्या टेस्टिंगच्या नावाखाली सुरु असणारा पाणी पुरवठा ठप्प करण्याचे काम समितीच्या पदाधिकार्‍यांनी केले असल्याचा आरोप वाघ यांनी केला आहे. येत्या 31 मार्च पर्यंत 50 टक्के वीज बिल माफ झाले नाही तर त्यानंतर एप्रिल महिन्यात कधीही योजनेचा वीज पुरवठा बंद होऊ शकतो याकडे वाघ यांनी लक्ष वेधले. उन्हाळ्यात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण होण्यापूर्वीच समितीच्या पदाधिकार्‍यांनी पावले उचलावीत व सर्व गावांना संपूर्ण उन्हाळ्यात पुरेसे पाणी मिळेल याचे नियोजन करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.

टँकर सुरू करा

योजनेचा पाणीपुरवठा करणार्‍या भोजापूर धरणात पुरेसा पाणीसाठा असतानाही केवळ पाणी पुरवठा समितीच्या नियोजन शून्य कारभारामुळे भोकणी, खंबाळे, धारणगाव, पांगरीसह इतर गावांचा पाणीपुरवठा बंद झाला आहे. उन्हाळ्यात पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ ग्रामस्थांवर आली असून योजनेचे पाणी येत नाही तोपर्यंत या सर्व गावांना पंचायत समितीने टँकरने पाणीपुरवठा करावा.

- अरुण वाघ, सरपंच, भोकणी

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com