52 टँकर भागवतायेत 108 वाड्यांची तहान

Water Tanker
Water Tanker

नाशिक । प्रतिनिधी

मागील आठवडाभरापासून मान्सूनपूर्व पावसाने जिल्ह्यात हजेरी लावली असली तरी ग्रामीण भागात अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत 52 टँकरद्वारे 108 गाववाड्यांची तहान भागवली जात आहे. दिवसभरात टँकरच्या 126 फेर्‍याद्वारे दूरगाववस्तीत पिण्याचे पाणी पोहोचवले जात आहे.

हवामान खात्याने यंदा शंभर टक्के पावसाचा अंदाज वर्तवला असून जूनपासूनच आनंदघन बरसतील, अशी शुभवार्ता दिली आहे. गतवर्षी चांगला पाऊस झाल्याने यंदा दुष्काळाच्या झळा फारशा जाणवल्या नाहीत. ऐरवी मे महिन्यापर्यंत टँकरसंख्या सेंच्युरी पूर्ण करायची. यंदा जूनचा पंधरवडा लोटला तरी टँकरची संख्या शंभरच्या आत आहे.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 52 टँकरद्वारे 69 गावे आणि 39 वाड्यांना पाणी पुरवले जात आहे. यामध्ये 45 टँकर हे खासगी असून 7 सरकारी टँकर तहान भागवित आहे. सर्वाधिक टँकर हे कायम दुष्काळी असलेल्या येवला तालुक्यात सुरू आहे. येथील 43 गाव-वाड्यांसाठी तब्बल 17 टँकरने पाणी दिले जात आहे. त्या खालोखाल पेठमध्ये 7 टँकर सुरू आहेत. बागलाण आणि चांदवडमध्ये प्रत्येकी 6, मालेगाव आणि सुरगाण्यात प्रत्येकी 5, इगतपुरीत 3, देवळ्यात 2, नांदगावमध्ये अवघ्या एकाच टँकरने पाणी दिले जात आहे.

दरम्यान नाशिक, निफाड, दिंडोरी, सिन्नर आणि त्र्यंबकेश्वर हे तालुके टँकरमुक्त आहेत. तेथे एकाही गाव-वाड्यांसाठी सध्या टँकरची आवश्यकता नाही. तर सध्याच्या स्थितीत तब्बल 70 विहिरी अधिग्रहीत कऱण्यात आल्या आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com