उगाव, शिवडीत पाच दिवसाआड पाणीपुरवठा

उगाव, शिवडीत पाच दिवसाआड पाणीपुरवठा

उगाव। पंढरीनाथ सोनवणे | Ugaon

विनता नदीचे (Vinta river) पात्र कोरडेठाक पडले असून पालखेड (khalkhed) कालव्याला देखील अद्याप पाणी सोडले नसल्याने उगाव (ugaon), खेडे (khed), शिवडी (shivde) परिसरात पाणीटंचाईची (water scarcity) समस्या गंभीर बनली आहे.

आत्ताच उगाव ग्रामपालिकेच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेअंतर्गत (Public water supply scheme) असलेल्या नळांना पाच ते सहा दिवसांच्या अंतराने अल्प पाणीपुरवठा (water supply) होत असल्याने हंडाभर पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाली आहे. येथे कायमस्वरूपी योग्य ती पाणीपुरवठा योजना (water supply scheme) राबवावी अशी मागणी सातत्याने होत असतांनाही अद्याप त्यावर उपाय सापडला नसल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

उगाव, खेडे व शिवडी येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजना (Public water supply scheme) ही प्रामुख्याने पालखेड डाव्या कालव्यावर अवलंबून आहे. या कालव्याचे पाणी विनता नदीपात्रात सोडण्यात येते. साहजिकच या नदीपात्रात बांधण्यात आलेल्या बंधार्‍यातून हे पाणी पाणीपुरवठा करणार्‍या विहिरीत टाकले जाते. तेथून ते गावात नळाद्वारे वितरीत होते. परंतु ग्रामपंचायतीने राबविलेली ही पाणीपुरवठा योजना आठ ते दहा वर्षांपूर्वीची असून त्यावेळी या योजनेवर अवघे 57 लाख रु. खर्च करण्यात आले होते. परंतु त्यावेळी पुढील 25 वर्षात गावात वाढणारी लोकसंख्या विचारात घेऊन या योजनेचे नियोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

मात्र योजना सुरू झाल्यापासूनच गावातील गवळी चौक, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र परिसर तसेच उगाव-पिंपळगाव रस्त्याच्या कडेला असलेले दिनकरनगर, रो हाऊस परिसरात अद्यापपर्यंत पूर्ण दाबाने पाणीपुरवठा होऊ शकला नाही. नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यात येवूनही नागरिकांना दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता. आजच्या परिस्थितीत मात्र विनता नदीपात्रातील पाण्याने तळ गाठल्याने पाच ते सहा दिवसातून अल्पस: पाणीपुरवठा होत आहे. गावातील हनुमान मंदिर, श्रीराम मंदिर येथून कूपनलिकेतून होणारा पाणीपुरवठा देखील बंद झाला आहे.

त्यातच सार्वजनिक पाणीपुरवठा योजनाही कोलमडून पडली आहे. दरवर्षी पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांसाठी उन्हाळ्यात जाणवणारी आपत्कालीन तीव्र पाणीटंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडून पाणी साठ्याचे आरक्षण केले जाते. मात्र प्रत्यक्षात मार्चच्या अखेरीस व एप्रिलमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्यानंतर कागदी घोडे नाचविल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय व पालखेड डाव्या कालवा कार्यालयातील काही झारीतील शुक्राचार्य हेतू पुरस्कुर अडवणूक करतात.

आजच्या घडीला पालखेड डाव्या कालव्यातून पूर्ण क्षमतेने लाभक्षेत्रातील निफाड व येवला तालुक्यातील शेतकर्‍यांना सिंचनासाठी व त्याला जोडूनच पिण्याच्या आरक्षित पाण्याचा पाणीसाठा सोडण्यात आला आहे. मात्र आताच्या घडीला पालखेड धरणातून पाणीपुरवठा बंद होण्याची शक्यता असतांनाही पालखेड डाव्या कालव्यातून पाणी सोडले जात नाही. साहजिकच पाणीटंचाईची समस्या अधिक गंभीर होवू लागली आहे. त्यामुळे पाणीटंचाईच्या झळा कमी करण्यासाठी पालखेड डाव्या कालव्याचे पाणी विनता नदीपात्रात तत्काळ सोडावे अशी मागणी परिसरातून होत आहे.

दोन दिवसात पाणीपुरवठा सुरळीत होईल उगाव येथील पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पालखेड डाव्या कालव्यातून विनिता नदीपात्रात पाणी सोडण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. येत्या दोन दिवसात पालखेड डाव्या कालव्यावरील भालेराव नाल्यावरील स्वयंचलित गेटमधून विनता नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दोन दिवसात उगावकरांना सुरळीतपणे पाणीपुरवठा केला जाईल.

- जे.के. गायकवाड, ग्रामविकास अधिकारी (उगाव)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com