मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

शहरास पाणीपुरवठा करणार्या गिरणा धरण पाणीपुरवठा योजनेच्या पंपींग केंद्रास वीज वितरण कंपनीतर्फे 33 ऐवजी 29 केव्ही वीजपुरवठा केला जात आहे. कमी होत असलेल्या वीजपुरवठ्यामुळे धरणातून पाणी कमी उपसले जात असल्याने शहरातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.

एक दिवसाऐवजी तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा करावा लागत असल्याने जनतेचे विशेषत: महिलांचे हाल होत असल्याने शहरात असंतोष पसरला आहे. येत्या रविवारपर्यंत 33 केव्ही वीजपुरवठा न केला गेल्यास महावितरण कार्यालयासमोर आपण कार्यकर्त्यांसह आमरण उपोषणास बसू, असा इशारा काँग्रेसचे माजी आ. शेख रशीद यांनी दिला आहे.

वीजवितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता अल्केश अग्रवाल यांना माजी आ. शेख रशीद यांनी निवेदन देत पाणीपुरवठा योजनेच्या केंद्रास वीजपुरवठा कमी स्वरूपात केला जात असल्याने विस्कळीत झालेल्या पाणीपुरवठ्याकडे लक्ष वेधले. गिरणा धरणातून चार ते पाच पंपांव्दारे पाण्याचा उपसा केला जातो. यासाठी 33 मेगावॅटचा वीजपुरवठा केला जातो.

मात्र गेल्या काही दिवसांपासून वीजपुरवठा 33 ऐवजी 29 केव्ही दिला जात आहे. त्यामुळे फक्त दोन पंपांव्दारे पाण्याचा उपसा धरणातून केला जात असल्याने शहरातील पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडून पडले असून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दोन ते तीन दिवसाआड पाणीपुरवठा होत असल्याने नागरीकांचे विशेषत: महिलांचे हाल होत आहे. अंग भाजून काढणार्या तीव्र तापमानात महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. कृषि वीजपंपांसाठी शहराला वीजपुरवठा कमी केला जात असल्याची माहिती आहे. मात्र यामुळे पाणीपुरवठा विस्कळीत होवून जनतेचे हाल होत असल्याचा आरोप शेख रशीद यांनी केला.

मनपातर्फे वर्षाकाठी वीजबिलापोटी 6 कोटी रूपये वीज वितरणला नियमित स्वरूपात दिले जात आहे. जनतेची गैरसोय होवू याची काळजी मनपातर्फे घेतली जाते. असे असतांना देखील वीज कपात करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा असून येत्या रविवारपर्यंत 33 केव्ही वीजपुरवठा सुरू न झाल्यास महावितरण कार्यालयासमोर आपण उपोषणास बसू या संदर्भात मनपा आयुक्तांनी जिल्हाधिकार्यांचे देखील लक्ष वेधले असल्याचे शेख रशीद यांनी शेवटी सांगितले.