नाशिक । प्रतिनिधी Nashik
अल निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्याची वेळ जिल्ह्यावर येण्याची शक्यता आहे.यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत आज शनिवारी (दि.8) सकाळी 10.30 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक होत आहे. दरम्यान, अल निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर तातडीने टंचाई कृती आराखडा तयार करून तो सादर करण्याच्या सूचना प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या आहेत.
अल निनोच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (दि.6) जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी पारधे यांनी यंत्रणांची आढावा बैठक घेतली. प्रशांत महासागरातील अल निनोच्या संभाव्य धोक्यामुळे यंदाच्या वर्षी मान्सून ऑगस्टपर्यंत लांबण्याची शक्यता असून तो जेमतेम राहील, असेही बोलले जात आहे. संभाव्य संकट बघता पाण्याचे आतापासूनच नियोजन करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर अल निनोचे संकट व टंचाईच्या उपाययोजनांबाबत राज्याच्या मुख्य सचिवांनी मंगळवारी (दि.11) बैठक बोलावली आहे. या बैठकीची पूर्वतयारी म्हणून पारधे यांनी आढावा घेतला.
बैठकीत पारधे यांनी जिल्ह्यातील पाण्याची उपलब्धता, संभाव्य टंचाईची परिस्थिती लक्षात घेऊन अतिरिक्त पाण्याची मागणी, गावनिहाय चारा उपलब्धतेबाबतचा समावेश कृती आराखड्यात करून हा आराखडा शुक्रवार (दि. 7) पर्यंत सादर करण्याच्या सूचना केल्या होत्या.तसेच महापालिका, जिल्हा परिषद व नगरपालिका यांनी पाण्याची मागणी आणि टंचाई काळातील उपाययोजनांचा आराखडा सादर करावा,असेही पारधे यांनी सांगितले आहे.
बैठकीला मालेगावच्या अपर जिल्हाधिकारी माया पाटोळे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, महापालिका, जिल्हा परिषद, जलसंपदा विभाग, आरोग्य विभागाचे अधिकारी, जिल्ह्यातील सर्व प्रांताधिकारी उपस्थित होते.