उगावला पाणीटंचाई

पाच दिवसांआड पाणीपुरवठा
उगावला पाणीटंचाई

उगाव । वार्ताहर Ugaon

राज्यभरात पुराच्या पाण्याने थैमान घातले असून नागरिकांना या पूर संकटाचा सामना करावा लागत आहे. मात्र असे असतानाही तालुक्याच्या उत्तर भागात पाणीटंचाईची (water scarcity ) समस्या गंभीर बनली असून विनता नदीपात्र आटल्याने येथे पाच दिवसांतून पाणीपुरवठा ( Water Supply ) होवू लागला असून सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी येथे पहाटेपासूनच महिलांच्या रांगा लागल्याचे पहावयास मिळत आहे.

तालुक्याची द्राक्षपंढरी म्हणून उगावची ओळख सर्वदूर आहे. व्यापारी बाजारपेठेमुळे येथे व्यावसायिक, कामगार, शेतमजूर, परप्रांतीय नागरिक यांची संख्या मोठी आहे.

उद्योगधंद्यांमुळे उगावचे नाव सातासमुद्रापार पोहोचले असले तरी येथील पाणीटंचाई मात्र नागरिकांची पाठ सोडावयास तयार नाही. उगावची पाणीपुरवठा योजना विनता नदीवर अवलंबून असून मागील महिन्यात पालखेड डाव्या कालव्यातून येवल्यासाठी पाणी सोडण्यात आले होते. त्यावेळी स्थानिक ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांनी तहसीलसह जिल्हाधिकारी कार्यालयात उगावच्या पाणीटंचाईची समस्या लक्षात आणून देत विनता नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी केली होती.

मात्र त्यावेळी संबंधित अधिकार्‍यांनी याकडे सोईस्कर दुर्लक्ष केल्याने आज उगाव परिसरातील जनतेला पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. अधिकार्‍यांच्या दुर्लक्षाबरोबरच पावसानेही या परिसराकडे पाठ फिरवल्याने पाणीटंचाईचे संकट अधिक गडद झाले आहे. यावर्षी मे महिन्यात मान्सूनपूर्व पाऊस बरसला. त्यानंतर जूनच्या अखेरीस रिमझिम पावसाने हजेरी लावली. या पावसावर शेतकर्‍यांनी टोमॅटो, मिरची आदी नगदी पिकांची लागवड केली. मात्र आता पाऊसच नसल्यामुळे ही पिके जळू लागली असून यातील अनेक पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे उभी पिके वाचवण्यासाठी शेतकरी हजारो रुपये किमतीची किटकनाशके फवारूनही रोगाचा प्रादूर्भाव कमी होताना दिसत नाही.

साहजिकच पिण्याच्या पाण्याच्या टंचाई बरोबरच सिंचनाचा प्रश्नदेखील गंभीर बनला आहे. उगाव, शिवडी, खेडे या तिन्ही गावांचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी कादवा नदीपात्र किंवा गोदावरी नदीपात्रातून पाणीपुरवठा योजना राबवावी अशी मागणी परिसरातील नागरिक अनेक वर्षांपासून करीत असतानाही त्याबाबत मात्र पाठपुरावा होत नसल्याने आणखी किती काळ येथील महिलांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. त्यामुळे परिसरातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी याकामी पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com