मनमाडकरांवर पुन्हा पाणीटंचाईचे संकट

मनमाडकरांवर पुन्हा पाणीटंचाईचे संकट

मनमाड । Manmad

पाणी पुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणातील पाणी साठा कमी झाल्यामुळे शहरात पुन्हा भीषण पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

पाण्याची उपलब्धता लक्षात घेत शहरात महिन्यातून फक्त दोन वेळा पाणी पुरवठा केला जाणार असल्याचे मुख्यधिकारी विजयकुमार मुंढे यांनी जाहीर केले आहे.

आठ महिन्यांपूर्वी धरण ओवर फ्लो झाले होते शिवाय पालखेड धरणातून सर्व रोटेशन घेण्यात आले आहे असे असतांना धरणातील पाणीसाठा कमी कसा झाला? आमच्या हक्काचे पाणी कुठे मुरले? अगोदरच आम्ही गेल्या अनेक वर्षापासून पाणी टंचाईला तोंड देत असतांना गेल्या वर्षी धरण तुडुंब भरल्याचे पाहून पाणी टंचाईतून सुटका झाली, असे आम्हाला वाटत असतांना पुन्हा पाणी टंचाई निर्माण झालीच कशी असे अनेक प्रश्न शहरातील नागरिक उपस्थित करीत आहे.

दरम्यान, या पाणी टंचाईला पालिका प्रशासनाचा विशेषत: मुख्याधिकारी मुंढे यांचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

पालकमंत्री, आमदार आणि जिल्हाधिकार्‍यानी या पाणीटंचाईचे संकटाची चौकशी करून दोषी अधिकार्‍यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पाणीटंचाईने त्रस्त शहरवासियांतर्फे केली जात आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. विशेषत: वागदर्डी धरणाच्या पाणलोटक्षेत्रात जबरदस्त पर्जन्यवृष्टी झाली होती त्यामुळे धरण तुडुंब भरून ओवर फ्लो झाले होते.

अनेक वर्षानंतर धरण फुल भरून वाहू लागल्याचे पाहून पाणी टंचाईने हैराण झालेले शहरातील सव्वालाख नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. वागदर्डी धरणाची क्षमता 110 दशलक्ष घनफूट इतकी असून पालखेड धरणातून 4 आवर्तनाच्या माध्यमातून सुमारे 100 दशलक्ष घनफूट पेक्षा जास्त पाणी मिळाले आहे.

एकीकडे धरण पूर्ण भरलेले दुसरीकडे पालखेड धरणातून मिळाले पाणी त्यामुळे किमान दीड वर्ष पुरेल इतका पाणी साठा असताना देखील शहरावर भीषण पाणी टंचाईचे संकट आले कसे? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

धरणातून पाणी साठा कमी कसा झाला? पाणी चोरी गेले का ? जर चोरी गेले असेल तर पालिका प्रशासन काय करीत होते ?असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे.शहरात निर्माण झालेली पाणी टंचाई ही कृत्रिम असून त्याला पालिका प्रशासन आणि मुख्याधिकारी हेच जबाबदार असल्याचे नागरिकांनी सांगितले.

दरम्यान धरण उशाला अन कोरड घशाला अशी गत झाली असून नेहमीच उन्हाळ्यात शहरात पाणी टंचाई निर्माण होत असते मात्र यंदा पावसाळ्यात देखील महिन्यातून दोन वेळाच पाणी पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे.

एकीकडे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाल्यामुळे एक हंडा पाण्यासाठी टाहो फोडण्याची वेळ नागरिकावर आलेली असताना दुसरीकडे मात्र छोट्या-छोट्या गोष्ठीसाठी रस्त्यावर उतरणारे लोक प्रतिनिधी, राजकीय पक्ष आणि सामजिक संघटना पाणी टंचाई बाबत मात्र गप्प आहे.

पालिका प्रशासनाला याबाबत कोणीही जाब विचारताना दिसत नसल्याचे पाहून नागरिकांच्या संतापात आणखी भर पडली असून या शहराला कोणी वाली उरला नसल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com