नवीन नाशिक | प्रतिनिधी

विजयनगर व साईबाबानगर परिसरात असलेल्या पावसाळी नाल्यामध्ये दुर्गंधीयुक्त घाण वाहत असल्यामुळे या परिसरातील नाल्याच्या बाजूला राहत असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे निवेदन विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांना देण्यात आले...

या निवेदनात असे नमूद केले आहे की, दुर्गंधीयुक्त घाण पाण्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

या दुर्गंधीयुक्त घाणीमुळे या नाल्या लगतच्या परिसरामध्ये अतिशय घाण वास तसेच या नाल्यांमधील वेगवेगळ्या प्रकारचे जंतू आळया यांनी नागरीकांचा घरामध्ये शिरकाव केला आहे.

यामुळे नागरिकांना जेवण करणे व तसेच त्या परिसरामध्ये राहणे मुश्किल झालेले आहे या सर्व प्रकारामुळे परिसरातील लहान मुलांबरोबरच नागरिकांचा आरोग्याचा खुप गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे.

विभागीय अधिकारी व सेवक यांना एक महिन्यापासून यासंदर्भात तोंडी तक्रार केली आहे. भाजप मंडल 1 अध्यक्ष शिवाजी बरके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक नागरिकांचा मोर्चा विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांच्या कार्यालयात नेण्यात आला यावेळी विभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली.

येत्या दोन दिवसांत या नाल्यांमध्ये ज्या ठिकाणाहून हे दुर्गंधीयुक्त पाणी घाण येत आहे ते ताबडतोब बंद करून नाला स्वच्छ करून पूर्ववत करावा अन्यथा हि दुर्गंधीयुक्त घाण आपल्या कार्यालयांमध्ये आणून टाकु असे आव्हान करण्यात आले.

यावेळी उत्तम सातभाई, विठ्ठल शितोळे, करण शिंदे, लता काची, वंदना बर्गे, बेबी आहेर, भावना मोरे, अलका सातभाई पूर्णिमा निकम, पुष्पा मोकळ, ताराबाई शितोळे, आदींसह परिसरातील नागरिक उपस्थित होते.