
मनमाड-नांदगाव । प्रतिनिधी Manmad- Nandgaon
रेल्वे रूळ ( Railway Line ) ओलांडताना होणारे अपघात व फाटक बंद असताना नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून भुयारी मार्ग ( Subway ) बांधण्यात आले. मात्र बहुतांश ठिकाणी पावसाळ्यात भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्यामुळे हे मार्ग असून अडचण नसून खोळंबा ठरू लागले आहे. मनमाड, नांदगावला येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे ( Rain ) भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने त्यातून वाहने देखील जात नसल्याने रेल्वे प्रशासनाविरुद्ध नागरिकांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला.
पावसाळ्यात अंडरपासमध्ये पाणी साचेल याची अधिकार्यांना कल्पना नव्हती का? मग पाण्याचा निचरा होण्यासाठी पुरेशी व्यवस्था का करण्यात आली नाही? असा प्रश्न आ. सुहास कांदे यांनी उपस्थित करून पाण्याचा निचरा होण्यासाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात यावी, शिवाय दोषी अधिकार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा आ. कांदे यांनी दिला आहे.
रेल्वे प्रशासनाने रेल्वे फाटक बंद करत भुयारीमार्ग निर्माण केले आहेत. मनमाड शहरातील 28 युनिटजवळ असलेल्या औरंगाबाद व दौंड मार्गावरील फाटक बंद करून त्याजागी भुयारी मार्ग करण्यात आले. रेल्वे मार्गावर असलेल्या फाटकाच्या दुसर्या बाजूला माळेगाव, वंजारवाडी, सटाणे, बेजगाव, भालूर, कर्ही, एकोळी, घाडगेवाडी, निशाणवाडी, मोहेंगाव आदी गावे आहेत.
नांदगावच्या मध्यभागातून जाणार्या रेल्वे रूळावरील फाटक बंद करून त्याजागी भुयारी मार्ग काढण्यात आला आहे. तालुक्याचे स्थान असलेल्या नांदगाव तालुक्यात 105 गावांचा समावेश असून शहराच्या रेल्वे मार्गाच्या दोन्ही बाजूला शहर वसलेले आहे. दोन्ही भागातील नागरिकांसोबत सुमारे 80 ते 90 गावाचे ग्रामस्थ आणि शेतकरी वर्ग ट्रक व इतर वाहनातून धान्य, कांदे, भाजीपाला यासह इतर शेतमाल घेऊन बाजार समितीत येतात.
नांदगाव शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील सर्वच भुयारी मार्गात गुडघ्या एवढे पाणी साचले होते. त्यामुळे त्यातून वाट काढणे जिकिरीचे झाले. तीन ते चार फुटांचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना वळसा मारत जुन्या लेंडीनदी रेल्वे रुळावरून जीव धोक्यात घालून जावे लागले तर वाहनधारकांना पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागली.
अंडरपासला जोडणारा रस्ता तीव्र उताराचा आणि काटकोनात असल्याने तसेच येथे नैसर्गिक जलस्रोत असल्याने अंडरपासच्या उपयोगीतेवर सुरुवातीपासून प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. सुरुवातीपासूनच वादग्रस्त असलेल्या या अंडरपासच्या कामात बरीच दिरंगाई आणि कुचराई झालेली आहे. ती नांदगावकरांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. रेल्वे प्रशासनाने भुयारी मार्गात साचत असलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी पुरेशी व्यवस्था करावी. तसेच या कामात हलगर्जीपणा करणार्या दोषी अधिकार्यावर कारवाई करावी अन्यथा शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा आ. सुहास कांदे यांनी दिला आहे.