पाणी कपातीचा निर्णय लवकरच- महापौर कुलकर्णी
नाशिक

पाणी कपातीचा निर्णय लवकरच- महापौर कुलकर्णी

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात अद्यापही वरुणराजाने पाठ फिरविल्याने या भागातील धरणात गत वर्षाच्या तुलनेत जलसाठा अल्प आहे. नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रात पाऊस नसल्याने जलसाठा ४० टक्क्यावर आला आहे. ही स्थिती लक्षात अजुन चार पाच दिवस पाऊसाची प्रतिक्षा करु, समाधानकारक पाऊस न झाल्यास शहरात पाणी कपातीचा विचार करु अशी माहिती महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिली.

मुंबईला पाणी पुरवठा करणार्‍या धरणांतील साठा पन्नास टक्क्यापेक्षा कमी झाल्याने या महापालिकेने २० टक्के पाणी कपातीची घोषणा केली आहे. तसेच पुणे महापालिकेने पाणी कपातीच्या दिशेने विचार सुरू केला असुन अशीच स्थिती नाशिक महापालिकेची आहे. नाशिक जिल्ह्यातील सर्वात पर्जन्यमान असलेल्या इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, दिंडोरी व नाशिक तालुक्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी या भागातील धरणांत अल्प असा जलसाठा झाला आहे.

या पार्श्वभूमीवर माहिती देतांना महापौर कुलकर्णी म्हणाले, नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गंगापूर धरण समुहात सध्याचा जलसाठा ४० टक्क्यापर्यत आला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हा साठा निम्मा आहे. गेल्या काही दिवसापासुन धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झालेला नाही. अजुन चार पाच दिवस पावसाची वाट पाहु. त्यानंतर शहरातील पाणी कपातीचा विचार करणार आहे.

तहान लागल्यावर विहीर खोदण्याचा प्रकार

नाशिक शहराला पाणी आरक्षणसंदर्भातील करार गेल्या अकरा वर्षापासुन महापालिकेने केलेला नाही. यासंदर्भात महापौरांनी दोन महिन्यापुर्वी बैंठक घेण्याचे जाहीर केले होते. ही बैठक अजुनही घेण्यात आलेली नाही. आताही धरणात पाणी ४० टक्क्यापर्यत आले आहे. अशाप्रकारे गंभीर प्रकाराबाबत सत्ताधारी किती गंभीर आहे? हे लक्षात येते. तहान लागल्यानंतर विहीर खोदण्याचा हा प्रकार आहे.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते महापालिका

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com