सिद्धपिंप्री। वार्ताहर

येथील ऑगष्ट महिन्यापासून प्रशासकच उपलब्ध नसल्याने येथील विकासकामे ठप्प झाली असून सोमवारपर्यंत ग्रामपंचायतीत प्रशासक रुजू झाला नाही तर ग्रामपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा जि.प. सदस्य यशवंत ढिकले यांचेसह ग्रामस्थांनी दिला आहे.

मागील ग्रामपंचायतीचा कार्यकाल ऑगष्ट महिन्यात संपला असून शासनाच्या आदेशानुसार प्रशासकाची नियुकी करण्यात आली. मात्र नेमलेला प्रशासक भाऊसाहेब शिरोडे गावात आला कधी आणि गेला कधी हे गावाला दिसलेच नाही. त्यातच चौकशी केली असता ऑफिसला काम आहे या नावाने मनमानी करुन निव्वळ टाईमपास के ला आणि शेवटी गावात प्रशासक दिसत नाही तर चौकशी केली असता परस्पर रजेवर निघून गेले.

नंतर तत्काळ जि.प. चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्याकडे जि.प. सदस्य यशवंत ढिकले यांनी याबाबत तक्रार दाखल केली. त्यामुळे त्यांनी तत्काळ दुसरे प्रशासक चेतन गवळी यांची नियुक्ती केली. परंतू गवळींना देखील येथील ग्रामपालिकेचा चार्ज घेण्यासाठी वाट पहावी लागत आहे. आजच्या परिस्थितीत गावात ग्रामपालिकेचे 14 व्या वित्त आयोगातून नविन बांधकाम करण्यात येऊन ते पूर्ण झाले आहे. परंतू संबंधित ठेकेदाराला काम पूर्ण करुनही प्रशासन नसल्यामुळे पेमेंट मिळत नाही.

याव्यतिरिक्त गावातील विकासकामे मोठ्या प्रमाणात थंडावली आहे. असे असतांनाही आतापर्यत चार ते पाच वेळा पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी श्रीमती.बारी, जि.प. चे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांच्याकडे गावचे शिष्टमंडळ जाऊन आले. मात्र त्यांनीही याकडे लक्ष न देता बघ्याची भूमिका घेतली. गावात आज प्रशासक येईल, उद्या येईल या आशेवर ग्रामस्थ असून गेल्या पाच महिन्यापासून गावाचा विकास ठप्प झाला असल्याने सोमवारपर्यंत प्रशासक न आल्यास ग्रामपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारा यशवंत ढिकले यांनी दिला.

यावेळी आंबादास ढिकले म्हणाले की, प्रशासकाअभावी गावचा विकास ठप्प होऊन नागरिकांना तोंड देणे अवघड होत आहे. त्यामुळे येथे तत्काळ प्रशासक द्यावा अन्यथा पं.स. वर मोर्चा काढण्यात येईल.