रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

आरोग्य विज्ञानपीठ-तळेगाव दिंडोरी रस्ता कासवगतीने
रस्त्यासाठी आंदोलनाचा इशारा

दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

नाशिक (आरोग्य विज्ञानपीठ) ते तळेगाव दिंडोरी( Talegaon- Dindori Road ) या रस्त्याला प्रशासकीय मान्यता मिळून रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली असली तरी ते अतिशय कासवगतीने सुरू असल्याने हा रस्ता केव्हा पूर्ण होणार, असा संतप्त सवाल विचारला जात असून कामाला गती न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा नागरिकांकडून दिला जात आहे.

करोनासदृश परिस्थितीमुळे विकासकामांना निधी नसल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर करोनाच्या विळख्यातून बाहेर पडल्यानंतर रस्त्यांच्या कामांना निधी आल्याचे सांगण्यात आले. पावसाळ्याच्या आधी आरोग्य विज्ञानपीठ ते तळेगाव दिंडोरीपर्यंतच्या रस्त्याला निधी प्राप्त झाला आहे. पावसाळ्याच्या आधी खड्डे भरले गेले. नंतर पावसाचे निमित्त दाखवत रस्त्याच्या दुरुस्तीला स्थगिती आली. आता पावसाळ्याला दोन महिने उलटून गेले तरीदेखील या रस्त्याच्या कामाला गती येत नाही हे विशेष? आताही खड्डेच भरले जात आहेत तेव्हा रस्त्याच्या मजबुतीकरणाला सुरुवात कधी होईल? असा सवाल विचारला जात आहे.

दिंडोरी शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती, श्री स्वामी समर्थ केंद्रात भाविक दर्शनासाठी दूरवरून येतात. याचबरोबर महाराष्ट्रातील अर्धे शक्तिपीठ मानल्या जाणार्‍या सप्तशृंगीगडावर भाविक मोठ्या भक्तिभावाने येत असतात. तसेच सापुतारा येथे पर्यटन स्थळ असल्याने येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. खराब रस्त्यामुळे व रस्त्यावरील उखडून पडलेली खडी व रस्त्यांच्या साईडपट्ट्या उखडल्यामुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अतिमहत्त्वाचा असून रस्त्याला ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अपघातांना सामोरे जावे लागते.

दिंडोरी तालुक्यातील शेतकरी शेतीमाल याच महामार्गाने नाशिक बाजारपेठेत घेऊन जातात. खराब रस्त्यांमुळे शेतकर्‍यांचा शेतीमाल वेळेत बाजारपेठेत पोहोचत नाही. तरी संबंधित विभागाने संबंधित ठेकेदाराला याबाबत जाब विचारत सदर कामाला गती प्राप्त करून देण्यासाठी सूचना द्याव्यात व लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

प्रवास सुखकर व्हावा यासाठी वारंवार मागणी केली जाते. परंतु नागरिकांच्या हातात वाटाण्याच्या अक्षदा दिल्या जातात. प्रशासकीय मंजुरी असूनही केवळ ठेकेदारांच्या कासवगतीच्या कामकाजामुळे आज सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. तरी संबंधित विभागाने त्या ठेकेदारास तंबी देत कामाला गती देऊन लवकरात लवकर काम पूर्ण व्हावे, अशा सूचना देण्यात याव्यात, अन्यथा तीव्र जनआंदोलन उभारले जाईल.

माधवराव साळुंखे, सामाजिक कार्यकर्ते, दिंडोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com