तोडफोड करून प्रभाग कार्यालयास कुलूप

विकास निधीच्या तरतुदीसाठी आंदोलन
तोडफोड करून प्रभाग कार्यालयास कुलूप

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

मालेगाव मनपा ( Malegaon Municipal Corporation ) प्रभाग एक कार्यालयअंतर्गत येणार्‍या पाचही प्रभागांमध्ये मागील अंदाजपत्रकात कुठलीही विकासकामे करण्यात आली नाही. यावर्षीदेखील विकासकामांसाठी निधीची तरतूद केली गेली नाही व जनतेस मूलभूत सुविधादेखील पुरवल्या जात नसल्याने शिवसैनिकांनी मोर्चा नेत प्रभाग कार्यालयातील अधिकारी, सेवकांना बाहेर काढत कुलूप ठोकले.

यावेळी संतप्त शिवसैनिकांनी दगडफेक करत प्रभाग कार्यालयातील काचेच्या खिडक्या फोडत खुर्ची व टेबलांची नासधूस करण्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली होती. सेना पदाधिकारी व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तोडफोड करणार्‍या शिवसैनिकांना बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. मनपा उपायुक्त गणेश गिरी, सुहास जगताप, लेखाधिकारी राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांनी आंदोलकांची भेट घेत आठ दिवसांत विकासकामांच्या निविदा प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, असे आश्वासन दिल्यानंतर शिवसैनिकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

मनपाच्या प्रभाग कार्यालय एकअंतर्गत येणार्‍या पश्चिम भागातील प्रभागांमध्ये मागील वर्षाच्या बजेटमध्येदेखील विकासकामे करण्यात आली नाही. यावर्षी 2022-2023 च्या अंदाजपत्रकातदेखील या प्रभागांमधील विकासकामांसाठी निधीची तरतूद केली गेली नाही. तसेच मूलभूत सुविधा पुरवल्या जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

या पार्श्वभूमीवर काल दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे माजी उपमहापौर नीलेश आहेर, सखाराम घोडके, विनोद वाघ, राजेश अलीझाड, प्रमोद पाटील, राजेश गंगावणे, प्रकाश अहिरे आदींच्या नेतृत्वाखाली सेना संपर्क कार्यालयातून प्रभाग कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. मनपा प्रशासनाचा, आयुक्तांचा व प्रभाग अधिकार्‍यांचा निषेध असो, जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा देत संतप्त शिवसैनिकांनी प्रभाग कार्यालयात प्रवेश केला. यावेळी प्रभाग अधिकारी जगदीश बडगुजर यांच्यासह कार्यालयातील सर्व अधिकारी व सेवकांना पदाधिकार्‍यांनी कार्यालयाबाहेर काढले. यावेळी काही संतप्त शिवसैनिकांनी प्रभाग कार्यालयावर दगडफेक करत काचेच्या खिडक्या फोडत कार्यालयातील खुर्च्या, टेबल व वायरींची नासधूस सुरू केल्याने प्रसंगावधान राखत उपमहापौर नीलेश आहेर, सखाराम घोडके यांनी धाव घेत तोडफोड करणार्‍या सर्व शिवसैनिकांना कार्यालयाबाहेर काढत प्रभाग कार्यालयास तसेच मुख्य प्रवेशद्वारास कुलूप लावले.

यावेळी संतप्त शिवसैनिकांनी मनपा प्रशासनानिषेधाच्या घोषणा देत परिसर दणाणून सोडला होता. प्रभाग एक कार्यालयअंतर्गत येणार्‍या सर्व प्रभागांमध्ये विकासकामांसाठी तरतूद केली जात नाही. तसेच मूलभूत सुविधा दिल्या जात नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. पूर्व भागात विकासकामांची निविदा प्रशासन प्रसिद्ध करते मात्र पश्चिम भागासाठी निधी व निविदा प्रसिद्ध करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने हे आंदोलन हाती घेण्यात आल्याचे उपमहापौर नीलेश आहेर यांनी स्पष्ट करत जोपर्यंत पश्चिम भागातील प्रभागांसाठी अंदाजपत्रकात विकासकामांसाठी तरतूद होणार नाही तोपर्यंत नागरिकांनी मनपास कुठलाही कर भरू नये, असे आवाहन केले.

माजी उपमहापौर सखाराम घोडके यांनी आयुक्त नियुक्त झाल्यापासून किती दिवस मनपात हजर राहिले हा संशोधनाचा विषय आहे. बंगल्यावर बसून एक-दोन दिवसच ते कामकाज करतात. त्यामुळे विकासकामे ठप्प झाली आहेत. मात्र या प्रकारामुळे पालकमंत्री बदनाम होत असल्याचा आरोप केला. या आंदोलनाची माहिती मिळताच उपायुक्त गणेश गिरी, सुहास जगताप, लेखाधिकारी राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त सचिन महाले यांनी आंदोलकांची भेट घेत चर्चा केली. आठ दिवसांत सर्व कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण करू, असे आश्वासन दिल्यानंतरच शिवसैनिकांनी आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात माजी नगरसेवक राजेश गंगावणे, प्रमोद पाटील, राजेश अलीझाड, ताराचंद बच्छाव, जयराज बच्छाव, यशपाल बागुल, किरण पाटील, बाळकृष्ण तिसगे, किशोर बच्छाव, शरद पाटील, संभाजी अहिरे, सचिन पठाडे, दिनेश गवळी, संतोष शिंदे, शरद बच्छाव, सोमनाथ खैरनार, बिपीन रायते आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवा सैनिक सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com