प्रभाग 5 : परिसराचा कायापालट करण्यात अपयश

प्रभाग 5 : परिसराचा कायापालट करण्यात अपयश

पंचवटी ।वार्ताहर Panchavati

रामकुंड Ramkund , सरदार चौक sardar Chowk , काळाराम मंदिर Kalaram mandir , नागचौक, मालवीय चौक, पंचवटी कारंजा Panchavatri Karanja , मालेगाव स्टॅण्ड, मखमलाबाद नाका, राजपाल कॉलनी, दत्तनगर, सुदर्शन कॉलनी, रोहिणीनगर, पेठरोड, पेठफाटा, एरंडवाडी, इंद्रकुंड असा गावठाण आणि कॉलनी, संमिश्र वसाहत परिसराचा प्रभाग 5 मध्ये समावेश आहे.

भारतीय जनता पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि अपक्ष या प्रभागाचे लोकप्रतिनिधी असून यातील तीन नगरसेवकांच्या मागे किमान पंधरा वर्षांच्या अनुभवाची शिदोरी असतानादेखील या परिसराचा कायापालट करण्यात अपयश आल्याचा आरोप मतदार करत आहेत.

प्रामुख्याने या प्रभागात सिंहस्थ कुंभमेळ्याचे शाहीस्नान येथील पवित्र रामकुंड तीर्थक्षेत्री होते. श्री काळाराम मंदिर, कपालेश्वर महादेव मंदिर, सीतागुंफा अशा पुरातन मंदिरांबरोबरच ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या अनेक वास्तू याच प्रभागात आहेत. देश-विदेशातून लाखो भाविक, पर्यटक येथे येतात. मात्र असा ऐतिहासिक वारसा लाभलेला परिसर आजदेखील समस्यांच्या गर्तेत आहे.

गोदाघाट विकसित करण्याचा संकल्प असो किंवा गोदाप्रदूषणासारखा संवेदनशील प्रश्न आजदेखील केवळ चर्चेचा विषयच राहून गेला आहे. या ठिकाणी विद्यमान लोकप्रतिनिधींना आपल्या अनुभवाचे कसब दाखवण्याची नामी संधी असताना यात अपयश आले आहे. पर्यटक, भाविकांना कुठल्याही सुविधा नाही. प्रभागातील तीर्थक्षेत्रासमवेत पेठरोड, एरंडवाडी, नवनाथनगर, दत्तनगर, राजपाल कॉलनी, मखमलाबाद नाका, पंचवटी कारंजा, नागचौक अशा भागातदेखील मूलभूत सुविधांचा अभाव दिसून येतो.

रस्त्याची दुरवस्था

- स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांमुळे रामकुंड ते सरदार चौक रस्त्याची दैना, कॉलनी आणि स्लम वसाहतींना नवीन रस्त्यांची प्रतीक्षा.

मोकाट जनावरांचा त्रास

-पेठरोड, नागचौक, नवनाथनगर, दिंडोरी नाका, मार्केट यार्ड, दत्तनगर कॅनॉल रोड परिसरात कचर्‍याचे ढीग, मोकाट कुत्रे, डुकरांचा त्रास.

उद्यान दुरवस्था

रामकुंड तीर्थक्षेत्री उद्यानाचा अभाव, पेठरोडसह इतर प्रभागात उद्यान आहे मात्र देखभाल नाही, शोभेचे उद्यान, लहान मुलांच्या खेळण्यांची दुरवस्था, गवताचे साम्राज्य, मोकाट जनावरांचा वावर.

आरोग्याचा प्रश्न गंभीर - प्रभागात स्लम वसाहतीत अस्वच्छतेमुळे साथरोगांचा प्रादुर्भाव, धूर फवारणी कधीतरी.

पाणी - कमी दाबाने पाणीपुरवठा, रहिवासी इमारतीत पाणी पोहोचत नसल्याच्या तक्रारी.

पथदीप- काही भागात नवीन पथदीपांची प्रतीक्षा, पोल आहे तर पथदीप नाही, अनेक पोलांची दुरवस्था.

दुर्गंधी- पेठरोड, दत्तनगर कॅनॉल, मखमलाबाद नाका ते ड्रीम कॅसल परिसरातील जनावरांच्या गोठ्यामुळे दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव, मलमुत्राचा प्रश्न ऐरणीवर.

फुटपाथवर अतिक्रमण - प्रभागातील पेठरोडवरील दैनंदिन भाजीबाजाराचा प्रश्न गंभीर, पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, दिंडोरी नाका या वर्दळीच्या भागातील फुटपाथवर अतिक्रमण.

भाविकांना त्रास - रामकुंड तीर्थक्षेत्री पार्किंगचा प्रश्न प्रलंबित. गोदाघाट परिसरात भिकार्‍यांचा उपद्रव, अस्वच्छतेचे भाविकांना प्रदर्शन. शौचालयांची दुरवस्था- प्रभागात सार्वजनिक शौचालयांची दुरवस्था, देखभाल दुरुस्तीअभावी अनेकांचे हाल.

दत्तनगर, सुदर्शन कॉलनी या भागातील उद्यानांची दुरवस्था झाल्याने लहान मुलांना हक्काची जागा नाही. काही भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. स्वछता कर्मचारी वेळेवर येत नाहीत.

- श्रीराम ( गणेश ) कोठुळ

परिसरात पिण्याच्या पाण्याचा अत्यंत बिकट प्रश्न बनला आहे. पाईपलाईन आहे पण पुरवठा अत्यंत कमी दाबाने असल्यामुळे नळ आहे पण पाणी नाही अशी अवस्था आहे. घंटागाडी प्रत्येक गल्लीत जात नसल्याने कचरा कुंडीचे प्रमाण वाढले आहे आणि प्रभागात ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. रामकुंड परिसरात पर्यटकांसाठी काहीच व्यवस्था नाही. स्मार्ट सिटीची कामे चालू आहेत पण पर्यटकांसाठी पायाभूत सुविधांचा अभाव आहे. त्यात भिकार्‍यांचा त्रास जास्त असल्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. एकूणच प्रभाग पाच हा लोकप्रतिनिधी आणि मनपा प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे दुर्लक्षित आहे.

- महेश महांकाळे

Related Stories

No stories found.