प्रभाग 4 : अस्वच्छतेने आजाराला आमंत्रण

अपुरी शौचालये, अडगळीत पडलेल्या उद्यानांमुळे नागरिक त्रस्त
प्रभाग 4 : अस्वच्छतेने आजाराला आमंत्रण

नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंचवटीतील panchavati प्रभाग 4 Ward No 4 हा कॉलनी व झोपडपट्ट्यांचा परिसर आहे. या प्रभागात सर्वाधिक झोपडपट्ट्या असल्यामुळे परिसरात समस्यादेखील अधिक आहेत. जागोजागी कचरा, पाण्याचा अपव्यय, अरुंद रस्ते, दाट लोकवस्ती, रस्त्यावर येणारे सांडपाणी, अपुरी शौचालये व त्यातील अस्वच्छता, बंद पथदीप, अडगळीत पडलेली उद्याने अशा अनेक समस्यांनी या प्रभागाला ग्रासले आहे.

प्रभागात जुना आडगाव नाका Old Adgaon Naka , वाल्मिकनगर Walmik Nagar , निमाणी बसस्टॅण्ड Nimani Bus Stand , फुलेनगर Phule Nagar, तारावालानगर, लामखडे मळा, मेरी कॉलनी, पाथरवट लेन, बुरूडडोह, छोटा राजवाडा, राहुलवाडी, वज्रेश्वरी झोपडपट्टी, वडारवाडी, गौंडवाडी, अवधूतवाडी, भराडवाडी, वैसालीनगर, कालिकानगर, राजदूतनगर, सम्राटनगर आदींचा समावेश होतो.

या भागात महापालिकेतून सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. मात्र अनेक कारणांमुळे त्यांचा पाहिजे तसा परिणाम साधला जात नाही. यामुळेच झोपडपट्टी भागातील समस्या सुटलेल्या नाहीत. आर्थिकदृष्ट्या गरीब असलेल्या मजुरांची संख्या मोठ्या प्रमाणावर असल्याने फुलेनगर परिसरात दाट वस्ती वाढत चालली आहे. छोट्या छोट्या जागेत पत्र्यांच्या शेड उभारून नागरिकांनी आपली राहण्याची सोय केलेली आहे. त्यामुळे येथील परिसरात जागोजागी कचर्‍याचे साम्राज्य झाल्याचे दिसून येते.

तसेच महापालिकेच्या सार्वजनिक नळांना पाणी अडवण्यासाठी कुठल्याही प्रकारच्या तोट्या नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास आले आहे. भराडवाडी, गौंडवाडी, अवधूतवाडी, राहुलवाडी, वडारवाडी अशा झोपडपट्टीच्या वस्तीत शौचालयाची समस्या अत्यंत गंभीर आहे. येथील लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या अत्यंत कमी आहे. तसेच या शौचालयांची स्वच्छता होत नसल्याने नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

जागोजागी कचर्‍याचे ढीग

अस्वच्छतेमुळे हा भाग आरोग्याला धोकादायक ठरत आहे. फुलेनगर, भराडवाडी, गौंडवाडी, अवधूतवाडी, राहुलवाडी, वडारवाडी या परिसरात जागोजागी कचर्‍याचे ढीग आढळून आले आहेत. तसेच सांडपाणी थेट रस्त्यावरून वाहते. पाणी वाहून जाणार्‍या ड्रेनेज चोकअप झाल्याने सांडपाण्याची समस्यादेखील गंभीर झाली आहे. कालव्याचा वापर कचरा कुंडीसारखा केला जात आहे. कालव्यात या झोपडपट्टीच्या भागातील कचरा टाकला जातो. सांडपाणी, कचरा यामुळे या झोपडपट्टीच्या भागात कालव्यात दलदल झाल्याचे दिसून येते.

घंटागाडीची समस्या

तारवालानगर, लामखडे मळा, वाल्मिकनगर परिसरात घंटागाडीची समस्या भेडसावत असल्याच्या स्थानिकांच्या तक्रारी आहेत. कच्च्या आणि अरुंद रस्त्यांच्या भागात घंटागाडी फिरतच नाही. काही परिसरात घंटागाडी कधी येते आणि कधी निघून जाते हे कळतच नाही, असे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच मेरी कॉलनी परिसरात अस्वच्छता आणि डुकरांची वाढलेली संख्या नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे.

पावसाळी गटार योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे. यामुळे प्रभागात पाणी निचरा होत नाही. लोकप्रतिनिधींनी गेल्या चार वर्षांत किमान चार वेळादेखील पाहणी केलेली नाही. घंटागाडी नियमित नसल्याने रस्त्याच्या कडेला घाणीचे साम्राज्य झाल्याचे दिसून येते.

- अ‍ॅड. सुदीप निकम

पथदीप बंद असल्याचा फायदा घेऊन मुली, महिलांच्या छेडछाडीचे प्रकार घडत आहेत. नव्याने विकसित होणारा भाग मूलभूत सुविधांपासून वंचित आहे. नळांना गढूळ पाणीपुरवठा होत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांचे डांबरीकरण झालेली नाही. खड्डे असल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे.

- इंजि. सागर लामखडे

या आहेत समस्या

उद्यानांवर झाडा-झुडपांनीच कब्जा

अनेक ठिकाणी तळीरामांचे अड्डे

खड्ड्यांचे साम्राज्य

बंद पथदीप

वाचनालयांचा अभाव

अपघातांचे वाढते प्रमाण

मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती

गावगुंडांचा हैदोस

मोकाट जनावरांचा त्रास

डंबरीकरणाची प्रतीक्षा

साथीच्या आजारांत वाढ

गढूळ पाणीपुरवठा

स्वच्छतागृहांची दुरवस्था

वाहतूक कोंडी

औषध फवारणी नाहीच

Related Stories

No stories found.