प्रभाग 11 : समस्यांबाबत अधिकारी उदासीन

परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव
प्रभाग 11 : समस्यांबाबत अधिकारी उदासीन

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रभाग 11 आनंद छाया ते त्र्यंबकरोड Aanandchhaya Road to Trimbak Road , आठ हजार व वीस हजार वसाहत, सातपूर कॉलनी Satpur Colony, समतानगर, श्रीकृष्णनगर, खोडे पार्क, महादेवनगर, सातपूर गाव, स्वारबाबानगर, राजवाडा, संतोषी माता नगर व प्रबुद्धनगरसह सातपूर औद्योगिक वसाहत यांचा समावेश असलेला हा प्रचंड मोठा असा प्रभाग आहे.

या प्रभागात शेतकरी, कष्टकरी, कामगार, छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक यांच्यासह तीन-चार स्लम भागाचा समावेश आहे. यात प्रामुख्याने गरीब कष्टकरी बांधवांपासून उच्चवर्ग क्षेत्रातील नागरिक व शेतकरी बांधवांचे वास्तव्य आहे.

चार जणांचा प्रभाग असल्याने परिसरात अनेक समस्या भेडसावत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते नाहीत. सर्वत्र स्वच्छतेअभावी घाणच घाण दिसून येते. महादेवनगरातील शौचालयालगत नवीन शौचालय उभारण्यात येत आहे. मात्र बांधकाम सुरू असल्याने जुन्या शौचालयाचा वापर करता येत नसल्याने नागरिकांची गैरसाय होत आहे.

तसेच परिसरातील नागरिकांसाठी एकही उद्यान नाही. त्याबाबत विचार करण्यात यावा. परिसरातील ड्रेनेजचा प्रश्न गंभीर झाला असून नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांची गती मंंद असल्याचे दिसून येते. सातपूर बसस्थानकाचे काम कुर्मगतीने सुरू आहे. किंबहुना मागील काही महिन्यांपासून बंदच आहे. महादेववाडी परिसरातून वाहणार्‍या नैसर्गिक नाल्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिसरातील नागरिकांच्या स्वस्थ्याचा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. सातपूर गाव अजूनही पुरातन गावागाड्याच्या परंपरेतून बाहेर आलेले नाही. आजही सातपूर गावाला शहरीकरणाचा स्पर्शही झालेला नसल्याचे दिसून येते. उलट विकासाची गंगा गावात पोहोचली नसल्याचे दिसून येते.

प्रबुद्धनगर व संतोषीमाता झोपडपट्टीच्या समस्या वेगळ्या आहेत. तेथे प्राथमिक सुविधांचाच मोठ्या प्रमाणात अभाव आहे. याबाबत प्रशासनाकडून नागरिकांच्या वाट्याला उपेक्षा येत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. सातपूरच्या छ. शिवाजी महाराज मंडई व सातपूर कॉलनीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केट या दोन बाजारपेठा या प्रभागात येतात.

सातपूर गावातील छ. शिवाजी मंडई बाजारपेठेला भव्य डोम उभारण्यात आला आहे. या ठिकाणी बायोमेट्रिक केलेल्या भाजीविक्रेत्यांंसोबतच बायोमेट्रिक न केलेल्या व्यावसायिकांची संख्या वाढू लागल्याने जागावाटप करण्यासाठी प्रशासनाची दमछाक होत असल्याचे चित्र आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटमध्ये या सुविधा सुरळीत असल्याचे दिसून येत आहे.

त्र्यंबकरोडवरचा भाजीबाजार हटवला गेला. मात्र या ठिकाणी फळबाजार मोठ्या प्रमाणात भरू लागला आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न जैसे थे आहे. प्रभाग 11 मध्ये चार हॉकर्स झोन निर्माण करण्यात आले आहेत. त्यातील तापारिया टूल्सलगतच्या झोनमध्ये मोठमोठ्या जागांवर हक्क सांगून मोठमोठी दुकाने थाटण्यात आलेली आहेत. या परिसरात गैरउद्योग खुलेआम सुरू असल्याचे बोलले जात आहे.

परिसरातील वसाहतींमध्ये छोट्या आकाराचे ड्रेनेज पाईप टाकण्यात आले आहेत. त्यामुळे चेंबर ओव्हरफ्लो होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. नदीकाठच्या पुलावर मोठ्या प्रमाणात कचरा पडून असतो.

- प्रताप काळे, स्थानिक रहिवासी

जाधव संकुल परिसरातील रस्ता उभारणी अतिशय विलंबित पद्धतीने पाठपुरावा करूनच झाली. जाधव संकुलात उद्यान व जॉगिंग ट्रॅकसाठी घोषणा झाली मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला. या परिसरातील मुलांसाठी उद्यान नाही ते तातडीने उभारावे.

- विजय अहिरे, स्थानिक रहिवासी

रस्त्याची दुरवस्था - अंतर्गत रस्त्यांची अवस्था गंभीर, शनिचौक, निगळगल्ली, राजवाडा, महादेववाडी परिसरातील अनेक ठिकाणी रस्त्याची दुरवस्था.

उद्यानांची दुरवस्था - प्रभागातील सातपूर गावात एकही उद्यान नाही. शासनाच्या खुल्या जागांवर गाजर गवताचे साम्राज्य, मोकाट कुत्रे व जनावरांचा वावर.

पथदीप- अनेक भागात नवीन पथदीपांची प्रतीक्षा.

भाजीबाजार - प्रभागातील छत्रपती शिवाजी मंडई भाजी बाजाराचे बांधकाम झाले मात्र संसर्गजन्य रोगांचा धोका लक्षात घेत भाजीविक्रेते रस्त्यावर, इतर भागातील दैनंदिन भाजीबाजाराचा प्रश्न गंभीर, परिसरातील सर्वच वर्दळीच्या भागातील फुटपाथवर अतिक्रमण.

हॉकर्स झोन- हॉकर्स झोन भागात बेबंदशाही सुरू आहे. कोणीही यावे टपरी लावावी असा मनमानी कारभार सुरू आहे. काही टपर्‍यांमध्ये गैरव्यवसाय चालवले जातात.

आरोग्याचा प्रश्न गंभीर -प्रभागात मायको हॉस्पिटल हे एकमेव प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. कचरा व घाणीमुळे, अस्वच्छतेमुळे साथरोगांचा प्रादुर्भाव, धूर फवारणी अनियमित, महादेवनगर भागातील नैसर्गिक नाल्यामुळे परिसरात दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव वाढला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com