प्रभाग 10 : विकासकामे संथगतीने

प्रभाग 10 : विकासकामे संथगतीने

नाशिक । प्रतिनिधी Nashik

प्रभाग 10 पिंपळगाव बहुलाचे पपया नर्सरी चौफुलीपुढे आनंदछाया बसस्टॉपमार्गे थेट दक्षिणमुखी साईबाबा मंदिरपर्यंत एक प्रभाग आहे. दक्षिणमुखी साईबाबा मंदिर ते अशोकनगर सात माऊली चौकमार्गे थेट राधाकृष्णनगरपर्यंत पुढे पिंपळगाव बहुला असा हा प्रचंड मोठा पसारा असलेला प्रभाग आहे.

या प्रभागात शेतकरी, कष्टकरी, कामगार, छोटे-मोठे व्यावसायिक, उद्योजक यांचे वास्तव्य आहे. गरीब कष्टकरी बांधवांपासून उच्चवर्ग क्षेत्रातील नागरिकांचा या परिसरात राबता असतो. राज्य कर्मचार्‍यांसाठीं स्वतंत्र वसाहत या प्रभागात आहे. चार जणांचा प्रभाग असल्याने परिसरात अनेक समस्या भेडसावत आहेत. अनेक ठिकाणी रस्ते नाहीत. सर्वत्र स्वच्छतेअभावी घाणच घाण दिसून येते.

ड्रेनेज तुंबणे अथवा सफाई न केल्याने मलमूत्र परिसरातील रस्त्यांवर पसरणे नेहमीचेच झाले आहे. तसेच परिसरातील उद्याने व पथदीपांचे प्रश्न गंभीर असून या परिसरातील ड्रेनेज तुंबण्याचा प्रश्न नागरिकांना मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. अनेक भागामध्ये ड्रेनेज व्यवस्था नसल्याने नागरिकांची अडचण निर्माण होत आहे. तर काही ठिकाणी ड्रेनेज यंत्रणेला योग्य उतार न दिल्याने काही सोसायट्यांमध्ये घाण पाणी परत चेंबरमधून बाहेर पडते. त्यामुळे त्या भागात घाणीचे साम्राज्य पसरत आहे.

अनेक ठिकाणी रस्त्यांच्या कामांची गती मंद असल्याचे दिसून येते. अशोकनगर मुख्य रस्त्यावर दुभाजक टाकण्याचे काम सुरू आहे. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून संथगती आहे. मध्यंतरी चारचाकी वाहनाला अपघाताला सामोरे जावे लागले होते. ठराविक उद्याने सोडली तर सर्वच ठिकाणी उद्यानांबाबत दुर्लक्ष दिसून येते.

आनंदछाया परिसरातून वाहणारा नैसर्गिक नाला घाणीचे साम्राज्य झाला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या समस्यांचा प्रश्न निर्माण होतो. महिलांसाठी उभारण्यात आलेल्या रोजगार प्रशिक्षण केंद्राची इमारत विनावापर पडून आहे.

राधाकृष्णनगर ते अशोकनगर मुख्य रस्त्याला जोडण्याचा मार्ग गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. जाधव संकुल येथे उद्यानांसाठी आरक्षित असलेल्या जागेवर उद्यान विकसित करण्याचे स्वप्न अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. अशोकनगर ते राधाकृष्णनगरदरम्यानचे रस्ते अतिशय अरुंद व वळणाचे असल्याने वाहनचालकांची तारांबळ होते. जाधव संकुलातील रस्त्यांचा प्रश्न अजूनही वादातीत आहे.

पिंपळगाव बहुला आणि अजूनही पुरातन गावातून शहरीकरणाची कात टाकलेली नाही. आजही पिंपळगाव बहुलामध्ये जाताना त्यांना शहरीकरणाचा स्पर्शही झालेला दिसून येत नाही. उलट विकासात गावपणाच कायम ठेवल्याचे दिसून येते.

जाधव संकुललगतच्या शनी गल्लीतील नागरिकांचा ड्रेनेजचा प्रश्न गंभीर झाला आहे. एकीकडे ड्रेनेज पाण्याला वाहण्यासाठीची दिशा दिलेली नसल्याने परिसरातील पाणी उलट्या दिशेने वाहते. प्रशासन केवळ आश्वासन देते. प्रश्न मात्र जसेच्या तसेच आहेत.

ठिकठिकाणी कचर्‍याचे ढीग मौले हॉल ते अशोकनगर पोलीस चौकीदरम्यान वाहतूक जास्त मात्र रस्ता छोटा, त्याचे चौपदरीकरण करावे. ड्रेनेजचे ढापे खाली-वर असल्याने अपघाताला निमंत्रण झाले आहे.

-हिरामण रोकडे, स्थानिक रहिवासी

जाधव संकुल परिसरातील रस्ता उभारणी अतिशय विलंबित पद्धतीने पाठपुरावा करूनच झाली. जाधव संकुलात उद्यान व जॉगिंग ट्रॅकसाठी घोषणा झाली. मात्र त्याच्या अंमलबजावणीसाठी सातत्याने पाठपुरावा करावा लागला. या परिसरातील मुलांसाठी उद्यान नाही. ते तातडीने उभारावे.

- नाना वाघ, स्थानिक रहिवासी

रस्त्याची दुरवस्था - गॅस पाईप लाईनसाठी फोडलेल्या रस्त्यांची अवस्था गंभीर. शनिचौक, जाधव संकुल, राधाकृष्णनगर, विश्वासनगर, राज्य कर्मचारी वसाहत परिसरातील अनेक रस्त्यांची दैना, रस्ता दुभाजकाचे काम संथगतीने, अपघातांना निमंत्रण.

उद्यानांची दुरवस्था - प्रभागात उद्यान आहे मात्र देखभाल नाही, ओस पडलेले शोभेचे उद्यान, लहान मुलांच्या खेळणींची दुरवस्था, गवताचे साम्राज्य, मोकाट कुत्रे व जनावरांचा वावर.

पथदीप- अनेक भागात नवीन पथदीपांची प्रतीक्षा.

भाजीबाजार-प्रभागातील अशोकनगर भागातील भाजी बाजाराचे बांधकाम झाले, मात्र गर्दी मोठ्या प्रमाणात दाटल्याने संसर्गजन्य रोगांचा धोका, भाजी विक्रेते रस्त्यावर, इतर भागातील दैनंदिन भाजीबाजाराचा प्रश्न गंभीर, परिसरातील सर्वच वर्दळीच्या भागातील फुटपाथवर अतिक्रमण.

आरोग्याचा प्रश्न गंभीर -प्रभागात प्राथमिक आरोग्य केंद्र नाही. अस्वच्छतेमुळे साथरोगांचा प्रादुर्भाव, धूर फवारणी अनियमित, आनंदछाया भागातील नैसर्गिक नाल्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला. महिला उद्योजक इमारत वापराविना पडून.

Related Stories

No stories found.