गोदावरीतील 'ती' भिंत निरीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार

स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने स्पष्टीकरण
गोदावरीतील 'ती' भिंत निरीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार

नाशिक । प्रतिनिधी

सन 2014 च्या तत्कालीन महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही रिटेनिंग वॉलबाबत निरीक्षण नोंदविण्यात आलेले आहे. यामुळे गोदावरीतील ती भिंत निरीच्या मार्गदर्शक तत्वानुसारच असल्याचे स्पष्टीकरण स्मार्ट सिटी कंपनीच्यावतीने करण्यात आले आहे. दरम्यान, पर्यावरणप्रेमींनी मात्र गॅबियन पद्धतीची दगडाची भिंत बांधण्याचा आपला आग्रह कायम ठेवला आहे.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या सूचनेनुसार गोदावरी नदीतील रामवाडी भागात सुरू असलेल्या कॉक्रीट भिंतीच्या स्थळाची पाहणी करण्यात आली. या पाहणी दौर्‍यात गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे अध्यक्ष निशिकांत पगारे, राजेश पंडित, आर्किटेक्ट कॉलेजच्या प्राचार्या प्राजक्ता बस्ते, कोमल कलावपुडी, तांत्रिक अधिकारी निरी, जीवन बेडवाल, वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजलसर्वेक्षण, सुधीर पगार, जलसंपदा विभागाचे शाखा अभियंता यांच्यासह नाशिक स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल आदी सहभागी झाले होते.

या पाहणीनंतर स्मार्ट सिटी कंपनीकडून एक प्रसिध्दीस माहिती देण्यात आली आहे. यात गोदावरी नदीतील रिटेनिंग वॉल निरीची मार्गदर्शक तत्त्वे आणि शिफारशींनुसारच करण्यात येत आहे. 2018 साली निरीला सादर करण्यात आलेला डीपीआर, तसेच तत्कालीन (सन 2014) महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बनविण्यात आलेल्या गोदावरी प्रदुषण उपसमितीचा अहवाल यांच्या प्रती नाशिक स्मार्ट सिटीच्या अधिकार्‍यांनी तज्ज्ञांच्या समिती समोर सादर केल्या. त्याचबरोबर गोदावरी नदी पात्राची नैसर्गिक रचनाही तज्ज्ञांच्या समितीला दाखवत सदर रिटेनिंग वॉलचे महत्त्व विषद केले. रामवाडी पूल ते होळकर पूल या दरम्यान नदीपात्राला वळण असल्यामुळे येथे असलेली गॅबियन वॉल पाण्याच्या मार्‍यामुळे खचणे, खराब होणे अशा प्रकारे नुकसान झाले.

तसेच पूर काळात येथे असलेली मलजल वाहिनी खचल्याने त्यातील मलजल नदीमध्ये मिसळत होते, हे तज्ज्ञांच्या समितीच्या निदर्शनास आणून दिले. त्याठिकाणी आता नाशिक स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्ट गोदा अंतर्गत मलजल वाहिनी बनविण्यात आली आहे. या सर्व गोष्टी पूर काळात पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे प्रभावीत होऊन भविष्यातही मलजलवाहिनी खचून पुन्हा मलजल गोदावरी नदीमध्ये मिसळू शकते, तसेच रामवाडी पूल ते होळकर पुलादरम्यान वळण असल्याने येथील मातीची होणारी धूप रोखणे गरजेचे आहे.

या महत्त्वपूर्ण बाबी नाशिक स्मार्ट सिटीच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी तज्ज्ञ समितीच्या निदर्शनास आणून दिल्या. तसेच निरीच्या तांत्रिक (सन 2018) अहवालानुसार 15 टक्क्यांपर्यंत हार्डस्केपिंग अनुज्ञेय असून प्रोजेक्ट गोदा अंतर्गत 8 टक्केच हार्डस्केपिंग करण्यात येत आहे. रामवाडी पुलाकडून पाण्याचा प्रवाह वळण घेऊन होळकर पुलाकडे येतो, त्यामुळे समोरील बाजूची माती पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून जाण्याची शक्यता आहे. हा सर्व अभ्यास करून त्यासंबंधीचा डीपीआर निरी या संस्थेकडे पाठविण्यात आला होता. तसेच तत्कालीन (सन 2014 साली) महापालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखालील समितीच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही रिटेनिंग वॉलबाबत निरीक्षण नोंदविण्यात आलेले आहे, असे स्मार्ट सिटी कंपनीने म्हटले आहे.

तो पर्यत भिंतीचे काम स्थगित

निरी या पर्यावरणवादी संस्थेने गोदावरी नदीसंदर्भात जी शिफारस केलेली आहे, त्याबद्दल पुढच्या आठ दिवसात सविस्तर माहिती द्यावी. तोपर्यत सिमेंट कॉक्रीटच्या भिंतीचे काम थांबविण्यात यावे असे समितीच्यावतीने आज ठरविण्यात आले असल्याची माहिती गोदावरी गटारीकरण विरोधी मंचचे निशिकांत पगारे यांनी दिली. गोदावरी नदीत निळ्या पूररेषेत स्मार्ट सिटी प्रशासनाच्यावतीने सिमेंट काँक्रीटची भिंत बांधली जात आहे. त्या भिंतीला आपण विरोध केलेला आहे. तसे पत्र विभागीय आयुक्त यांना दिलेले आहे. त्या नुसार आज समितीच्या वतीने पाहणी करण्यात आली.

निळ्या पुर रेषेत काँक्रीटच्या भिंती ऐवजी गॅबियन पद्धतीची दगडाची भिंत बांधली जावी जेणेकरून नदी जिवंत राहण्यास मदत होईल, तसे आदेशही उच्च न्यायालयाने दिलेले आहेत, असे आपले म्हणणे आहे. तर स्मार्ट सिटीत प्रशासनाचे म्हणणे आहे की, निरी या पर्यावरणवादी संस्थेने शिफारस केलेली आहे. आता निरीच्या शिफारशीत नेमके काय आहे, याची माहिती घेतल्यानंतर यात स्पष्टता येणार आहे. तोपर्यत नदीतील कॉक्रीटीकरणाचे काम थांबविण्याचा निर्णय आजच्या पाहणीनंतर समितीने घेतला असल्याची माहिती पगारे यांनी दिली. आजच्या या पाहणी दौर्‍यात नाशिक महानगरपालिकेचा एकही अधिकारी उपस्थित नव्हता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com