पंधरा वर्षांपासून रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

दिंडोरी-गाजरवाडीचा प्रवास खडतर
पंधरा वर्षांपासून रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

निफाड। प्रतिनिधी Niphad

तालुक्यातील दिंडोरी तास ते गाजरवाडी या रस्त्याची ( Dindori Tas To Gajarwadi Road ) गेल्या 15 वर्षात दुरुस्तीच न झाल्यामुळे रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले ( Pits on Road )असून शेतमाल वाहतुकीला अडचणी येत आहेत. तसेच शालेय विद्यार्थ्यांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

गेल्या दहा वर्षांपूर्वी लासलगाव आगाराची लासलगाव ते थडी सारोळे ही बस नैताळे, गाजरवाडी, दिंडोरी तास मार्गे दिवसातून दोन फेर्‍या करीत असे. त्यानंतर याच मार्गे लासलगाव-सिन्नर ही बस देखील सुरू करण्यात आली होती. या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा प्रवासाचा प्रश्न मार्गी लागला होता.

मात्र दिंडोरी तास ते गाजरवाडी या अवघ्या 3 कि.मी. च्या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने लासलगाव आगाराने या मार्गावरील बससेवा बंद केली. परिणामी गेल्या दहा वर्षापासून गाजरवाडी ग्रामस्थांना अद्याप बसचे दर्शन झालेले नाही. या रस्त्याच्या कडेने नांदूरमध्यमेश्वर धरणातून राबविण्यात आलेली लासलगावसह 16 गाव पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन असून सदरची पाईपलाईनला ठिकठिकाणी गळती लागल्याने हे पाणी रस्त्यावर येवून साचते.

रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली काटेरी झुडपे अन् वाढते खड्डे तसेच खड्डयांनी गाठलेली खोली यामुळे या रस्त्याने वाहने चालविणे अवघड होत आहे. शेतमालासह प्रवाशी वाहने खड्डयांमुळे थेट जमिनीवर टेकत असल्याने व मोटारसायकल चालवितांना देखील चालकाला मोठी कसरत करावी लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या कडेला दिंडोरी व गाजरवाडी परिसरातील अनेक शेतकरी वस्ती करून राहतात.

साहजिकच दररोज ये-जा करण्यासाठी शेतकर्‍यांना या खराब रस्त्याचा दररोजच सामना करावा लागत आहे. याच परिसरात ऊस, कांदा, द्राक्षे, भाजीपाला आदी नगदी पिकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. मात्र हा शेतमाल काढतांना खराब रस्त्याचा सामना करावा लागतो. शालेय विद्यार्थ्यांना मात्र या रस्त्याने दररोज पायपीट करावी लागते. कारण या रस्त्याने सायकल देखील चालू शकत नाही. रस्त्यावर पाण्याचे साचलेले डबके अन् वाढते खड्डे ही आता नित्याची डोकेदुखी ठरलेली असतांना अद्यापपर्यंत या रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त लागलेला नाही.

परिणामी गाजरवाडीचे शेतकरी नैताळे अथवा नांदूरला बाजारपेठेसाठी येतात तर दिंडोरी गाव रस्त्यावर असल्यावर त्याला कुठलीही अडचण येत नाही. मात्र जे शेतकरी या रस्त्याच्या बाजूला राहतात त्यांचेसाठी मात्र या रस्त्याचा प्रवास जिवघेणा ठरत आहे.

या रस्ता दुरुस्तीबाबत शेतकर्‍यांनी अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना निवेदने देत त्यांचेकडे कैफियत मांडली. मात्र आजपर्यंत त्याबाबत काहीएक कार्यवाही झालेली नाही. तसेच भविष्यात देखील हा रस्ता दुरुस्त होईल की नाही याची शाश्वती नसल्याने नागरिकांना याच खडतर रस्त्याने प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती ( Road Repairs )करावी अशी मागणी होत आहे .

Related Stories

No stories found.