नाशिक-कल्याण मेमूची प्रतीक्षा

नव्या पालकमंत्र्यांना नाशिककरांचे साकडे; दोन वर्षांपासून प्रश्न सुटेना
नाशिक-कल्याण मेमूची प्रतीक्षा

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिककरांना मुंबईशी कनेक्ट करणारी नाशिक-कल्याण मेमू म्हणजेच मेन लाईन इलेक्ट्रिकल मल्टिपर्पज युनिट (Main Line Electrical Multipurpose Unit) लोकल सुरू होण्याची वाट गेल्या चार वर्षांपासून नाशिककर पाहत आहेत. करोनाकाळात ही घोषणा हवेत विरली होती. मात्र नाशिक-कल्याण मेमू लोकल सुरू होण्याची आशा नाशिककरांना नव्या पालकमंत्र्यांकडून आहे. म्हणूनच पालकमंत्री दादा भुसे यांनी या प्रश्नाकडे लक्ष केंद्रित करावे, अशी मागणी नाशिककर करत आहे.

चार वर्षांपासून नाशिक-कल्याण लोकलचा विषय बारगळला आहे. रेल्वे विभागातील अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे नाशिकवर हा अन्याय सहन करायची वेळ आली आहे. चार वर्षांपासून नाशिक कल्याण-मेमू लोकलचे गाजर दाखवण्यात येत आहे. खा. हेमंत गोडसे यांनी यासाठी प्रयत्नही केले होते. यासंदर्भात रेल्वे अधिकार्‍यांशी अनेक बैठका झाल्या. कल्याण येथे राहणारे निवृत्त रेल्वे इंजिनतज्ज्ञ वामन सांगळे यांनी यासाठी प्रयत्नही केले. मात्र रेल्वे अधिकार्‍यांच्या नाकर्तेपणामुळे आजपर्यंत त्यांच्या प्रयत्नांना यश आलेले नाही.

नाशिक-कल्याण लोकलसेवेला लाल कंदिल दाखवण्यात आला होता. नवीन वंदे मातरम् मेमू लोकलचा घाट घातला गेला. लोकल ही संकल्पना रद्द करून मेमू लोकल चालवणार असल्याची अंतिम घोषणा रेल्वेने केली होती. खा. गोडसे यांनी लोकसभेत मागणी केल्यामुळे नाशिक-कल्याण लोकल मंजूर झाली. 32 कोटी रुपये खर्चून तयार केलेली ही लोकल कुर्ला कारशेडला येऊनही ठेवली. अंतर्गत तांत्रिक रचना अद्ययावत करून ही लोकल धावण्या योग्य तयारही करण्यात आली.

लोकलच्या टेस्टिंगसाठी नऊ लाख रुपये मंजूरही झाले होते. मात्र रेल्वे अधिकार्‍यांच्या नाकार्तेपणामुळे सध्या हा विषय रेंगाळत चाललेला आहे. म्हणूनच नव्या पालकमंत्र्यांकडून ही लोकल सुरू होण्याची आशा नागरिकांना असून केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. राज्यातही भाजप समर्थनाचे शिंदे सरकार आहे. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसे यांच्याकडून नाशिक-कल्याण मेमूची भेट मिळेल, अशी अपेक्षा सध्या नाशिककर व्यक्त करत आहेत. ही लोकल सुरू झाल्यावर शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, विद्यार्थी, महिला यांना नाशिक-मुंबई प्रवास करायला सोयीचे होणार आहे. नाशिककरांना शिक्षण, उद्योग, आरोग्य, रोजगार या क्षेत्रांना ऊर्जितावस्था मिळणार आहे.

ही लोकल सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना मुंबईला शिकण्यासाठी पर्याय राहणार आहे. शिवाय उद्योग क्षेत्रामध्ये कनेक्टिव्हिटी वाढवून लघुउद्योगांना चालना मिळू शकते. नाशिक-मुंबई कनेक्टिव्हिटी वाढून नाशिकच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागणार असल्यामुळे नव्या पालकमंत्र्यांनी ही लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

राजेंद्र पगारे, नागरिक

उद्योगांची कनेक्टिव्हिटी मेमू लोकलमुळे वाढू शकते. आरोग्याच्या दृष्टीने नव्या संधी नाशिकला चालून येऊ शकतात. शिवाय विद्यार्थी, महिलांना हव्या त्या स्टेशनवर उतरता येऊ शकते. इतर गाड्या प्रत्येक स्टेशनवर थांबत नाही म्हणून ही गाडी म्हणजे नाशिककरांची रोजगार व उद्योगाची लाइफलाईन ठरू शकते.

किसन गुळवे, नागरिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com