नाशिकच्या दुर्गम भागाला ‘इको-टुरिझम’ ची भेट
नाशिक

नाशिकच्या दुर्गम भागाला ‘इको-टुरिझम’ ची भेट

वनक्षेत्राच्या संवर्धनाला बळकटी

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक | Nashik

वनविभागाच्या वन व वनेतर जमिनीवरील जैव विविधता आणि निसर्ग संरक्षण योजनेंतर्गत स्वर्गीय उत्तमराव पाटील वन उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. यामुळे जिल्ह्यातील पारेगाव, माणिकपुंज आणि कन्नाने या दुर्गम भागाला यंदा ‘इको-टुरिझम’ची भेट मिळणार आहे.

सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकारातून साकारण्यात येणाऱ्या या तीन वनउद्यानांद्वारे नव्या वर्षात जैवविविधतेच्या संवर्धनासह निसर्ग माहिती केंद्र पर्यटकांसाठी खुले होणार आहे. त्यामुळे रोजगाराच्या संधीत वाढ होण्यासह नाशिकच्या दुर्गम भागातील वनक्षेत्राच्या संवर्धनाला अधिक बळकटी प्राप्त होणार आहे.

सामाजिक वनीकरण विभागातर्फे चांदवड तालुक्यातील पारेगाव, नांदगाव येथील माणिकपुंज आणि मालेगाव तालुक्यातील कन्नाने या गावांची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक गावातील ५ ते १० एकर क्षेत्रात ही वनाेद्याने साकारली जात असून स्थानिक स्वराज्य संस्थाकडे हस्तांतरण करण्यात येणार आहे. त्यासाठी या वर्षी ४६. ४६ लाखांचा निधी मंजूर झाला असून, या वैशिष्ट्यपूर्ण उद्यानात अद्ययावत निसर्ग माहिती केंद्रासह, संपूर्ण उद्यानाचा आराखडा, नकाशा, वनसंवर्धन याविषयीची माहिती असेल. यामुळे एकूणच निसर्गाच्या विविधतेची माहिती देणारे हे एक आगळेवेगळे शैक्षणिक केंद्र ठरणार असून, औषधी वनस्पती, रॉक गार्डन, नक्षत्र वन असे विविध विभागही पर्यटकांना आकृष्ट करतील.

निरीक्षण मनोरा, छोटे पूल, असलेल्या या उद्यानात वीज पुरवठ्यासाठी सौर उर्जेचा वापर करण्यात येणार आहे. या उद्यानात औषधी वनस्पतींसह धार्मिक महत्त्व असलेल्या काही महत्त्वाच्या वृक्षांची जोपासनाही करण्यात येणार आहे. यासोबतच उद्यानात फिरायला नैसर्गिक पायवाटा, वृद्धांसाठी आसने यामुळे हे उद्यान दुर्गम भागातील पर्यटनासाठी अधिक लोकप्रिय ठरेल, असे विभागीय वन अधिकारी चंद्रकांत भारमल यांनी सांगितले आहे.

राेजगार मिळण्यास मदत

या उद्यानांच्या माध्यमातून वन जमिनीवरील जैवविविधता अनुभवण्याची संधी पर्यटकांना मिळणार असून, त्यामुळे स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होण्यास मदत होईल. शिवाय विद्यार्थ्यांमध्ये वृक्षप्रजाती आणि वन्यजीवांविषयी आस्था निर्माण व्हावी, त्यांचे या गोष्टींकडे लक्ष आकर्षित व्हावे त्यासाठी या उद्यानात अभ्यासासोबत भविष्यात मनोरंजनाची साधने उपलब्ध करून देण्याचा सामाजिक वनीकरणाचा मानस आहे. त्यामुळे पर्यटनासह अभ्यासाच्या दृष्टीकोनातून येत्या काळात दुर्गम भागातील ही उद्याने अधिक फायदेशीर ठरणार आहेत.

जैवविविधतेच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी दुर्गम भागात वन उद्याने साकारण्यात येत आहे. नाशिकमधील हा पहिला प्रयत्न असून, मार्चमध्ये हस्तांतरण झाल्यानंतर इतर दुर्गम भागांच्या विकासासाठी प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे जतन, अभ्यास, पर्यटन आणि रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

- प्र. ज. लोणकर, वनसंरक्षक, सामाजिक वनीकरण

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com