आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा दौरा

आदिवासी क्षेत्र आढावा समितीचा दौरा

कळवण । प्रतिनिधी Kalwan

गेल्या काही महिने येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या सेवा विस्कळीत झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. परंतु कळवणमधील कामाचा पूर्वानुभव असलेले डॉ. अनंत पवार हजर झाल्यापासून रुग्णालयाचे प्रशासन गतिमान झाले आणि मिळणार्‍या सुविधांमध्ये सुधारणा झाल्याचे प्रतिपादन राज्यस्तरीय आदिवासी क्षेत्र आढावा समितीचे अध्यक्ष तथा वसई -विरार मतदारसंघाचे आमदार विवेक पंडित ( MLA Vivek Pandit) यांनी केले. आदिवासी उपाययोजना क्षेत्रातील कळवण तालुक्याचा दौरा केला. आ. विवेक पंडित त्यावेळी बोलत होते.

यावेळी वरिष्ठ संशोधन अधिकारी गोपाळ भारती, कळवणचे सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मिना, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधीर पाटील उपस्थित होते. आदिवासी क्षेत्रातील विविध योजनांची आढावा बैठक( Tribal Area Review Committee) येथील मध्यवर्ती प्रशासकीय कार्यालयात पार पडली.

बैठकीनंतर आ. विवेक पंडित यांनी आदिवासी जनतेला आरोग्यसेवा कशी मिळते, याची पाहणी करण्यासाठी प्रत्यक्ष उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन रुग्णालयात उपलब्ध असलेल्या सोयीसुविधा, करोना लसीकरण मोहीम, आपत्कालीन विभाग, अतिदक्षता विभाग, महिला कक्ष, प्रसूती विभाग, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया कक्ष, क्ष किरण, सोनोग्राफी, करोना विलगीकरण कक्षास विवेक पंडित यांनी भेट दिली.

भेटीप्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार यांनी रुग्णालय करोनाची संभाव्य तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले. यावेळी रुग्णालयातील अधिकारी, सेवक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com