कळवण बाजार समितीकडून सहा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट

कळवण कोविड सेंटरला प्रदान
कळवण बाजार समितीकडून सहा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर भेट

कळवण | Kalwan

करोना विषाणूच्या रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कळवण, मानूर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल झालेल्या रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासते.

शासनस्तरावर तिसरी लाट येणार या पार्श्वभूमीवर नियोजन केले जात असून बाल रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासणार आहे हे लक्षात घेऊन कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीने उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटरला सहा ऑक्सिजन कॉन्सट्रेटर देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.

आमदार नितीन पवार यांच्या हस्ते कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार यांच्या उपस्थितीत उपजिल्हा रुग्णालय कोविड सेंटर प्रमुख डॉ प्रल्हाद चव्हाण यांच्याकडे 6 ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर सुपूर्द करण्यात आले.

यावेळी बोलतांना आमदार नितीन पवार यांनी सांगितले की, सध्या करोना प्रतिबंधासाठी विविध संस्था वेगवेगळ्या माध्यमातून पुढाकार घेत असून कोरोनाची तिसरी लाट येणार म्हणून आरोग्य विभाग नियोजन करीत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेला सहा ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून देऊन कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीने सामाजिक बांधिलकी जोपासत आपले कर्तव्य पार पाडले असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले.

आमदार नितीन पवार यांनी तालुक्यातील संस्था, संघटना यांना कोविड सेंटरला मदत करण्याचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देऊन करोना रुग्णांची ऑक्सिजनसाठी होत असलेली परवड लक्षात घेऊन कळवण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कळवण कोविड केअर सेंटरला सहा ऑक्सिजन मशीन उपलब्ध करून दिले असून त्याचा रुग्णांना निश्चित लाभ होईल, असा आशावाद बाजार समितीचे सभापती धंनजय पवार यांनी यावेळी व्यक्त केला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com