कायद्याचे उल्लंघन; हॉटेल चालकांना लाखाचा दंड

महसूल विभागातर्फे आस्थापना सील; हॉटेलमधील गर्दी भोवली
कायद्याचे उल्लंघन; हॉटेल चालकांना लाखाचा दंड
USER

मालेगाव । प्रतिनिधी

करोना संक्रमण रोखण्यासाठी सुरू असलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे सर्रास उल्लंघन केले जात असल्याचे निदर्शनास आल्याने मालेगावलगत असलेल्या मुंबई-मालेगाव महामार्गावरील हॉटेल ग्रॅण्ड सविता व हॉटेल शिवा पंजाब या दोन्ही हॉटेलला सील ठोकण्यात येऊन प्रत्येकी 50 हजार रुपये दंडाची वसुली केली गेली. प्रांत विजयानंद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली .

करोना उद्रेकामुळे राज्य शासनातर्फे आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी केली जात आहे. जिल्ह्यात प्रशासनातर्फे लॉकडाऊनची अंमलबजावणी देखील सुरू आहे. असे असताना देखील शहरासह लगत महामार्गावर असलेल्या हॉटेल व ढाबाचालक लग्न लावण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात विवाह सोहळे पार पाडत होते. एकीकडे मंगल कार्यालय व लॉन्समध्ये विवाह सोहळ्यांना परवानगी दिली जात नसताना दुसरीकडे मात्र सदर हॉटेल व ढाबेचालक 50 जणांच्या उपस्थितीत लग्न लावण्याच्या नावाखाली मोठे विवाह सोहळे करत होते. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे देखील सर्रास उल्लंघन केले जात होते. या संदर्भात मंगल कार्यालय व लॉन्स चालक संघटनांतर्फे तक्रारीदेखील करण्यात आल्या होत्या.

चंदनपुरी शिवारातील हॉटेल ग्रॅण्ड सविता व महामार्गावरील हॉटेल शिवा पंजाब या दोन्ही हॉटेल्समध्ये आपत्ती व्यवस्थापन कायद्याची पूर्णत: पायमल्ली केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने प्रांत विजयानंद शर्मा यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार चंद्रजित राजपूत तसेच संबंधित तलाठी व महसूल विभागाच्या पथकाने अचानक या दोन्ही हॉटेलांना भेट देत तपासणी केली असता तेथे आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे पूर्णत: उल्लंघन होत असल्याचे दिसून आले.

या संदर्भात प्रांत शर्मा यांनी जाब विचारला असता संबंधित हॉटेल चालकांतर्फे समाधानकारक उत्तरे दिली गेली नाही. त्यामुळे या दोन्ही हॉटेलला सील ठोकण्याचे आदेश देत 50 हजार रुपये दंडाची वसुली करण्याचे आदेश प्रांत शर्मा यांनी दिली. पथकातर्फे दोन्ही हॉटेल चालकांकडून लाखाचा दंड वसूल करण्यात येऊन हॉटेल सील केली गेली. या दोन्ही हॉटेलांची सातत्याने तपासणी करण्याचे निर्देश प्रांत शर्मा यांनी किल्ला व तालुका पोलीस ठाण्यास दिले आहेत.

लॉकडाऊन तसेच आपत्ती व्यवस्थापन कायद्याची अंमलबजावणी शहरातील व्यापारी प्रतिष्ठाने व हॉटेल चालकांतर्फे प्रामाणिकपणे केली जात असताना शहराबाहेर असलेली हॉटेल्स व ढाब्यांमध्ये लॉकडाऊनचा परिणाम दिसून येत नाही. 50 जणांच्या उपस्थितीत लग्न लावण्याच्या नावाखाली या हॉटेल्स् व ढाब्यांवर मोठे विवाह सोहळे देखील पार पाडले जात आहेत. करोना संक्रमण रोखण्याचा शासनाच्या हेतूलाच या हॉटेल चालकांकडून हरताळ फासला जात असल्याने संबंधितांवर महसूल विभागातर्फे कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली जात आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com