पंचवटी । वार्ताहर

करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती मध्ये होणारी गर्दी कमी करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेल्या नियमांची कठोरपणे अंमलबजावणी न झाल्यास समिती बंद करण्याचा इशारा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी शनिवारी दिला होता. या पार्श्वभूमीवर समितीने देखील त्वरित बाजार समितीत नो मास्क नो एन्ट्री असा आदेश दिला. मात्र यानंतर देखील रविवारी बाजार समितीत प्रशासनाच्या आदेशाला कुठेतरी हरताळ फसल्याचे दिसून आले.

महाराष्ट्रात करोनाचा पुन्हा उद्रेक झाला असून नाशिक जिल्ह्यात तर दररोज अडीच हजार रुग्णांची भर पडत आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती जिल्ह्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या ठिकाणी जिल्हाभरातून फळभाज्या, पालेभाज्या, कांदा-बटाटा असा माल घेऊन दररोज हजारो शेतकरी येत असतात. तसेच, काही मुंबईचे व्यापारीही बाजार समितीत येत असतात. शेतकरी, हमाल-मापारी आदी वर्गाचीही मोठी गर्दी होत असते. यावेळी सामाजिक अंतर आणि बर्याच जणांनी मास्क लावलेले नसते, शहरात जागोजागी भरणार्या भाजी बाजारातील भरेकरीदेखील बाजार समितीतून पालेभाज्या व फळभाज्या घेऊन जात असतात. समितीमध्ये ठिकठिकाणांवरून भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी येणार्या व्यापारी आणि शेतकरी यांच्यामुळे होणार्या गर्दीच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्याने गर्दीचे योग्य नियंत्रण नसेल तर बाजार समिती करोना संपेपर्यंत बंद करावी लागेल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी शनिवारी दिला होता.

दरम्यान, जिल्हाधिकार्यांच्या आदेशांनंतर सभापती देवीदास पिंगळे यांनीही तातडीने बाजार समिती प्रशासनाला खबरदारीच्या सूचना देत यापुढे बाजार समितीत ङ्गनो मास्क नो एण्ट्रीफ हा नियम कडक करण्यात येत असल्याची घोषणा केली. मात्र रविवारी दुपारी बाजार समिती नेहमी प्रमाणे गर्दीचा उंचाक होता. कुठल्याही प्रकारचे सामाजिक अंतर पाळताना दिसून आले नाही. मास्कचा वापर काही प्रमाणात होत असला तरी काही बाजार घटकांना करोनाची धास्ती नसल्यासारखे वावरत होते. जिल्हा प्रशासनाने आदेशीत केल्यानंतरही नियमांची अंमलबजावणी होत नसल्याने समिती मधील व्यापारी, आडतदार, हमाल, शेतकरी असे सर्वच घटकांनी एक प्रकारे शासनाच्या आदेशाला हरताळ फसल्याचे चित्र आहे.

समितीत मास्क वापराकडे दुर्लक्ष

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रशासनाच्या आदेशानंतर दिंडोरी रोडवरील मुख्य प्रवेशद्वारावर केवळ नागरिकांनी मास्क घातले आहे का याची सुरक्षा रक्षक तपासणी करत आहे. मात्र समितीच्या आतमध्ये बाजार घटकांकडून सुरक्षित अंतर पाळले जात नाही. काहींचे मास्क गळ्यात टांगलेले, नाकाच्या खाली असे घातल्याचे दिसून येत आहे. बहुतांश आडत कंपनीत सॅनिटायझरचा वापर दिसत नाही. शेतमाल पॅकिंग करणारे कामगार, हमाल यांच्याकडून मास्कचा वापर होत नाही. सुरक्षेच्या दृष्टीने बाजार समितीचे हॉटेल गोंधळ कडील प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे.