द्राक्षबागा, टोमॅटोला अतिपावसाचा फटका

खर्च वाढूनही उत्पादन घटण्याची शक्यता
द्राक्षबागा, टोमॅटोला अतिपावसाचा फटका

निफाड । प्रतिनिधी Niphad

सोमवारपासून सुरू झालेल्या हस्त नक्षत्रातील पावसाचा Heavy Rain वारू तालुक्याच्या चौफेर भागात उधळल्याने नदी-नाले दुथडी भरून वाहू लागले असून ज्या शेतकर्‍यांच्या द्राक्षबागा टोकनात आहेत अशा बागांवर डावणी व करपाचा प्रादुर्भाव वाढणार आहे.

या पावसाचा फटका टोमॅटो पिकालादेखील Tomato Crops मोठ्या प्रमाणात बसला असून अनेक ठिकाणी टोमॅटो झाडे भुईसपाट झाली आहेत. तर टोमॅटोची पोत खराब होऊन फळावर ठिपके पडू लागले आहेत. पावसाच्या तडाख्यात लाल कांद्याची रोपांसह लागवड झालेल्या कांद्यावर मावाचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने रोगापासून पिकांचा बचाव करण्यासाठी शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करण्यात व्यस्त झाले आहेत. साहजिकच उत्पादन खर्च वाढणार असला तरीदेखील उत्पादनात घट होण्याचे संकेत मिळत आहेत.

द्राक्षपंढरी म्हणून निफाडची ओळख आहे. साहजिकच येणार्‍या हंगामासाठी शेतकर्‍यांनी द्राक्षवेलीची छाटणी सुरू केली आहे. तालुक्यातील अनेक शेतकरी अर्ली प्लॉट घेतात. त्यामुळे अशा शेतकर्‍यांच्या द्राक्षवेलींवर डिपिंग होऊन फुटवे आले आहेत. मात्र अशा बागांवर आता डावणी जोर करण्याची शक्यता अधिक आहे. तर ज्या बागा टोकनात आहेत त्यांनाही डावणीचा सामना करावा लागणार आहे.

तालुक्यात दोन दिवस जोरदार पाऊस बरसल्याने द्राक्षबागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्यामुळे द्राक्षवेलींच्या मुळ्या चोकअप होऊन झाडांची अन्न प्रक्रिया मंदावणार आहे. सद्यस्थितीत टोमॅटो हंगाम ऐन बहरात आला असतानाच पावसाचे जोरदार आगमन झाले. त्यामुळे हा पाऊस टोमॅटो पिकास हानिकारक ठरू लागला आहे. प्रारंभी टोमॅटो हंगामाला बाजारभावाने मारल्याने अनेक शेतकर्‍यांनी टोमॅटो रस्त्यासह उकिरड्यावर ओतले. तर आता दोन पैसे मिळू लागल्याने जोरदार पावसामुळे टोमॅटो झाडे भुईसपाट झाली. ज्यांची यातून वाचली त्या झाडांची पानगळ होऊ लागली असून करपा रोगाचादेखील प्रादुर्भाव वाढू लागला आहे. त्यातच टोमॅटो फळावर ठिपके पडू लागल्याने शेतकर्‍यांची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे या रोगापासून टोमॅटो पीक वाचवण्यासाठी शेतकरी कीटकनाशक व पोषकांची फवारणी करू लागले आहेत.

सध्या लाल कांदा लागवडदेखील अनेक ठिकाणी सुरू आहे. मात्र या पावसाचा फटका कांदा रोपांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. कोवळ्या रोपांचे सडण्याचे प्रमाण वाढले असून लागवड झालेल्या कांद्यावरदेखील नव्याने आलेला टिळे नावाचा रोग पसरू लागला आहे. यामुळे कांदापात वाकडी होत असल्याने त्याचा थेट परिणाम कांदा वाढ खुंटण्यावर होत आहे. साहजिकच प्रारंभीची पाणीटंचाई तर आता अतिपावसाचा फटका यामुळे खरिपाचा हंगाम संकटात सापडला आहे.

मात्र हाच पाऊस पुढील रब्बी हंगामासाठी लाभदायक ठरणारा असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजी आणि खुशी असा दुहेरी माहोल दिसू लागला आहे. एकूणच या पावसामुळे पाणीटंचाईचे संकट टळले असून नदी, नाले, पाझर तलाव तुडुंब भरून वाहू लागले आहेत, तर विहिरींच्या पाणी पातळीतदेखील वाढ होऊ लागली आहे. दोन दिवस बरसलेल्या पावसामुळे शेतीमशागतीची कामे ठप्प झाली असून द्राक्षबागांसाठी लागणारे मजूर पेठ, सुरगाणा, सापुतारा आदी भागातून दाखल होऊ लागल्याने ग्रामीण भागातील गावे या मजुरांनी गजबजणार आहेत.

छाटणीला उशीर

या पावसामुळे ज्या शेतकर्‍यांनी द्राक्षबागा छाटल्या त्यांना डावणी व करपाचा सामना करावा लागेल तर नवीन ग्राफ्टिंग झालेल्या बागांवरदेखील डावणीचा प्रादुर्भाव वाढेल. तर बागेत पाणी साचल्यामुळे द्राक्ष छाटणीला विलंब होईल. परिणामी पुढे थंडीच्या वेळेस त्याचा थेट परिणाम द्राक्षमणी फुगवणीवर होईल. तसेच अतिपावसामुळे घड जिरण्याचे प्रमाणदेखील वाढेल. त्यामुळे औषधांच्या खर्चात मोठी वाढ होईल. द्राक्षाप्रमाणेच कांदा पिकावरदेखील रोगांचा प्रादुर्भाव वाढेल.

कैलास तासकर, शेतकरी (दिंडोरी तास)

Related Stories

No stories found.