विंचूर-लासलगाव पाणीपुरवठा योजना कोलमडली

विंचूर-लासलगाव पाणीपुरवठा योजना कोलमडली

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

लासलगाव-विंचूरसह ( Lasalgaon- Vinchur ) 16 गाव पाणीपुरवठा पाइपलाइन दुरुस्तीसाठी 15 व्या वित्त आयोगातून माजी मंत्री छगन भुजबळ यांनी आदेश करून तरतूद केलेला 65 लाख रूपये तत्काळ पाणीपुरवठा ( Water Supply ) सुरळीत करण्यासाठी दुरूस्तीचे आदेश दिले होते. मात्र अद्यापही हा निधी ग्रा.पं. च्या बँक खाती जमा आहे. निधी खर्च न झाल्यामुळे दोन महिने उलटूनही पाण्याची समस्या जैसे थे असल्याने लासलगावकरांना भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे हा वर्ग झालेला निधी तत्काळ खर्च करावा अशी मागणी शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील यांनी केली आहे.

लासलगाव-विंचूरसह सोळागाव पाणीपुरवठ्याच्या लाभार्थी गावातील पाणीटंचाई दूर होणे बाबत 26 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक येथे माजी मंत्री छगन भुजबळ यांनी विशेष बैठक घेऊन जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण समितीचे मुख्य अधिकारी वर्ग यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेऊन तातडीने लासलगाव विंचूरसह सोळा गावातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या 15 व्या वित्त आयोगातून निधी पाईपलाईन दुरुस्तीसाठी खर्च करण्याचे आदेश दिले होते.

यात लासलगाव ग्रा.पं. 25 लाख रु., विंचूर ग्रा.पं. 20 लाख रु., पिंपळगाव नजिक ग्रा.पं. 10 लाख रु., टाकळी विंचूर ग्रा.पं. 10 लाख रु. अशी चार गावे अंदाजे 65 लाख रुपयांची तरतूद करून पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी पाईपलाईन दुरूस्तीचे आदेश दिले होते. मात्र देखभाल दुरूस्ती समिती पदाधिकारी व अधिकार्‍यांच्या बेजबाबदार पणाच्या वागण्यामुळे निधीची तरतुद असून देखील तो खर्च न झाल्यामुळे लाभार्थी गावातील नागरिकांना 12 ते 25 दिवसा आड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरीकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधीकारी लिना बनसोड, गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी पाण्याचे गांभीर्य ओळखून पाईपलाईन दुरूस्तीचे काम पुर्ण करण्याबाबत सूचना करण्याची मागणी शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील, ग्रा.पं. सदस्य अमोल थोरे, शहरप्रमुख प्रमोद पाटील, जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप, तालुका समन्वयक केशव जाधव, गणप्रमुख उत्तम वाघ, सुनील आब्बड, बाळासाहेब शिरसाठ, संतोष पवार, गणेश इंगळे, संतोष पानगव्हाणे, माधव शिंदे, रविराज बोराडे आदींनी केली आहे. युती शासनाच्या काळात तत्कालीन आमदार कल्याणराव पाटील यांनी लासलगाव-विंचूरसह सोळा गाव पाणीपुरवठा योजना मंजूर केली होती. मात्र आता ही योजना कार्यान्वित होवून अनेक वर्षाचा कालावधी लोटल्याने या योजनेचे पाईप जिर्ण झाले आहे. त्यामुळे हे पाईप ठिकठिकाणी फुटत असून या योजनेवर अवलंबून असणार्‍या सोळा गावातील नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे.

तसेच पाइपलाइन ही अनेक शेतकर्‍यांच्या शेतातून गेल्याने अनेक ठिकाणी शेतात देखील या पाइपलाइनला गळती लागल्याने शेतकर्‍यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवून त्यांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्यामुळे नांदूरमध्यमेश्वर धरणापासून ते लासलगाव, टाकळी विंचूरपर्यंत नव्याने पाईपलाईन टाकणे गरजेचे असल्याने याबाबत पाणीपुरवठा समितीने सकारात्मक निर्णय घेण्याबरोबरच ग्रा.पं. ने देखील पुढाकार घेणे गरजेचे बनले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com