विनायकनगर ग्रामस्थ स्वखर्चाने करताय टँकरने पाणी पुरवठा

ठेकेदाराने सोडले काम अर्धवट
विनायकनगर ग्रामस्थ स्वखर्चाने करताय टँकरने पाणी पुरवठा

नाशिक | Nashik

त्र्यंबक तालुक्यातील गणेशगाव पैकी विनायकनगर हा पाडा सध्या स्वखर्चाने टँकरने गावाला पाणी पुरवठा करीत आहे.

विनायकनगर हा पाडा गेल्या दोन महिन्यांपासून पिण्याच्या पाण्यासाठी लढा देत आहे. येथील सरपंचाने स्वतःचा टॅक्टर देत गावाने टँकरची व्यवस्था केली आहे. दिवसातून १२ तेरा खेपा केल्या जातात. हे पाणी ग्रामपंचायतिच्या विहिरीत टाकल्यानंतर गावाची तहान भागवली जाते.

दरम्यान ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. यासाठी नदीकाठी विहिरही खोदल्याचे सरपंच सांगतात. या विहिरीला भरपूर पाणी देखील लागले आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून ठेकेदार कामावर नसल्याने काम बंद पडले आहे. परिणामी गावात येणारे पाणी विहिरीतच राहिले आहे.

विनायकनगर आणि गणेशगाव मिळून ग्रुप ग्रामपंचायत आहे. उन्हाळ्यात पाणी टंचाई हमखास असते. याचा पाठपुरावा म्हणून पाणी पुरवठा योजनाही आणली पण ती गावापर्यंत पोहचलीच नाही. त्यामुळे येथील महिलांना दोन किमीची पायपीट करून नदीवर पाणी आणण्यासाठी जावे लागते.

सध्या पाणी पुरवठा योजनेची विहीर खोदली असून तिला पाणीही लागले आहे. परंतु ठेकेदाराने करोनाचे कारण देत अर्धवट काम सोडून दिले आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांना स्वखर्चाने टँकरद्वारे गावाला पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे.

गावच्या पाणी योजनेचे काम ठेकेदाराने अर्धवट सोडले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून काम बंद आहे. अधिकाऱ्याकडे तक्रार केल्यावर त्यांच्याकडे टाळाटाळ केली जाते. एकीकडे कोरोनाचे व दुसरीकडे पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे.

- रखमाबाई उदार, सरपंच विनायकनगर

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com