महावितरण व महामार्ग प्रशासनाच्या वादात अडकले पथदिप; टोल नाका बंद करण्याचा ग्रामस्थांचा इशारा

महावितरण व महामार्ग प्रशासनाच्या वादात अडकले पथदिप;  टोल नाका बंद करण्याचा ग्रामस्थांचा इशारा

सिन्नर | प्रतिनिधी

महावितरण आणि राष्ट्रीय महामार्गाच्या वादात वावीसह सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पथदिप बंद पडले असून याचा फटका ग्रामस्थांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे. येत्या दोन दिवसात महामार्गावरील विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामस्थांच्या वतीने पिंपरवाडी टोल नाक्यावर आंदोलन करण्याचा इशारा सरपंच विजय काटे यांनी दिला आहे.

शिर्डी महामार्गाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. महामार्गावर गावपातळीवर दोन्ही बाजूने महामार्ग प्रशासनाच्यावतीने पथदिपांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, गावानजीक असलेले पथदीप काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. महामार्गाचे काम करत असताना ठेकेदराने ग्रामपंचायतचे विद्युत खांब काढून टाकले होते. त्याऐवजी महामार्ग प्रशासनाने नवीन पोलची तरतूद करुन त्याठिकाणी स्वतःचे पथदिप बसवले होते.

त्यामुळे ग्रामपंचायतने ही पुन्हा पथदीप उपलब्ध करुन दिले नाही. मात्र, महामार्गाच्या कडेला लावण्यात आलेले पथदीप अद्याप बंद अवस्थेत असल्याने ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्यावेळी पथदीप बंद राहत असल्याने महामार्गावर संपूर्णता काळोख पसरलेला असतो.

महामार्ग अधिकाऱ्यांकडून या पथदिपांचे जवळपास साडे नऊ लाख रुपये वीजबिल थकविल्याचे समजत आहे. त्यामुळे महावितरण कंपनीने महामार्गावरील विद्युत पुरवठा खंडित केला असल्याचे शाखा अभियंत्याचे म्हणणे आहे.

ग्रामस्थांनी याबाबत महामार्ग प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना याबाबत वेळोवेळी जाब विचारुनही यात सुधारणा होत नाही. या अधिकाऱ्यांकडून केवळ कंपनीची पाठराखण करुन सुविधा पुरवण्यास टाळाटाळ करत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात पथदीप सुरु न झाल्यास टोल बंद आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

'देशदूत' / 'सार्वमत'चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com