दिंडोरी । प्रतिनिधी Dindori

दिंडोरी तालुक्यात अनेक ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहे. ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर होताच हवशे, नवशे, गवशे असे सारेच कामाला लागलेले आहेत. परंतू कोणत्या पात्रतेचा उमेदवार ग्रामपंचायतीत असावा, याबाबत मात्र मतदारांच्या काही ठोस अपेक्षा आहेत.भष्टाचारी आणि ठेकेदार झालेल्या नेतृत्वांना तिलांजली देऊन मतदारांना विकासाभिमुख दृष्टीकोन असलेल्या चारीत्र्यसंपन्न उमेदवारांचीच अपेक्षा लागलेली आहे.

अनेक वर्षापासून गावपातळीवर अनेक सत्ता केंद्रे कार्यरत आहेत. त्यामुळे अशा केंद्राना शह देण्यासाठी गावातील जागृत पिढी पुढे चालली आहे. या पिढीला सध्या गटतट पक्ष, नातेसंबंध याबाबी महत्त्वाचे वाटत नसून त्यांना केवळ गावाचा विकास हीच बाब महत्त्वाची वाटत आहे. व्हाटसअॅप, फेसबुक यासारख्या सोशल मिडीयांंच्या प्रभावामुळे मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने प्रत्येकजण आपल्या गावाची तुलना इतर गावातील विकासाशी करत आहे. त्यामुळे सुध्दा विकासकामांना चालना मिळत आहे.

या पार्श्वभुमीवर आता होत असलेल्या ग्रामपंचायत आणि नगरपंचायत या निवडणूका विकासाच्याच मुद्यावर लढवल्या जात आहे.युवकांची आणि जनतेची माफक अपेक्षा या निवडणूकीत उमेद्वारांकडून दिसून येत आहे. त्यासाठी उमेद्वार हा सुशिक्षित असावा, त्याचे किमान शिक्षण 12 वी उत्तीर्ण असावे. त्याला सामाजिक समस्यांचे अनुभव असावा, तो गावासाठी त्याग करणारा असावा, त्याला शासकीय योजनांची माहिती असावी आणि विकासकामे मंजूर करुन आणण्याची त्याची क्षमता असावी, त्याला विविध घटकांचा अभ्यास असावा,अशी अपेक्षा जनतेची आहे.

त्याचबरोबर तो व्यसनाधिन नसावा, त्याला कोणताही नाद नसावा, ही सुध्दा माफक अपेक्षा जनतेची उमेद्वाराबाबत दिसून आली. उमेद्वाराला राजकीय रंग नसावा, तो फक्त निवडणूकी पुरताच राजकीय पक्षाचा असावा, निवडणूक झाल्यानंतर त्याने फक्त जनतेचेच हित पहावे, त्याने निवडणूकीनंतर खुणसेचे राजकारण न करता विरोधकांनाही मोठ्या मनाने विकासाच्या प्रवाहात सामावून घ्यावे अशी त्याची विचारधारा असावी, त्याच्या वृत्तीत नवीननवीन गोष्टी आत्मसात करण्याची क्षमता असावी. तो बहुगुण संपन्न असावा, गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर कसे चमकेल, या बाबतही त्याची प्रयत्नांची पराकाष्टा असावी, अलीकडच्या काळात हिवरे बाजार आदर्श गावाचे प्रणेते पोपटराव पवार त्याचप्रमाणे पाटोद्याचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांचे उदाहरणे प्रत्येक गावात दिली जात आहे.

गावाचा विकास कसा करावा, गाव लोकाभिमुख कसे करावे, याचे उदाहरणे भास्कर पेरे पाटलांच्या व्याख्यातून दिली जात आहे. भास्कर पेरे पाटलांचा आदर्श गावाचा व्हिडीओ निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर गावोगावी व्हाटसअॅपवर फिरत आहे. व्हाटसअॅपच्या माध्यमातून गावोगावी जागृती घडून येत आहे. सरपंच पदाबाबत जनतेच्या माफक अपेक्षा आहेत. अनेकवेळा निवडणूका झाल्यानंतर सरपंच पदाच्या निवडणूकीत घोडे बाजार होतो. निवडून आलेल्या उमेद्वारांची पळवापळव होते. अनेकांना पैश्यांचे अमिष दाखवल्या जाते. त्यातून राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. तो होवू नये, म्हणून गावातील प्रतिष्ठीत व्यक्तीचे त्यावर नियंत्रण असावे.

सरपंच ंहा सुध्दा निवडतांना केवळ आपला माणूस हा निकष न लावता त्याचे मुल्यमापन हे सार्वजनिक विकासावर असावे. त्यात कोणताही नात्याचा निकष लावू नये. अनेकवेळा पात्रता नसलेले लोक सत्तेवर बसले तर संपुर्ण गावाचेच नुकसान होते. सत्ताधारी सदस्यच जर ठेकेदार झाले तर नुकसान होते. गावाचा विकास खुंटला तर गाव 20 ते 25 वर्ष मागेही जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. गावाचे हीत साधतांना गाव महात्मा गांधी तंटामुक्त गाव म्हणून घोषित करण्यावरही भर द्यावी लागणार आहे. महाराष्ट्रातील नगर जिल्ह्यातील आमदार निलेश लंके यांनी गावाची निवडणूक बिनविरोध करणार्या गावांना एक लाख रुपयांचे बक्षीस देण्याची घोषणा केली असून त्यात प्रोत्साहन देण्याची त्यांची संकल्पना स्तुत्य आहे. म्हणून असा आदर्श प्रत्येक आमदाराने घेऊन गाव तंटामुक्त करावे. दिंडोरी पंचायत समितीचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य एकनाथ खराटे यांनी सुध्दा गावाची निवडणूक बिनविरोध करणार्या सदस्यांसाठी एक लाख शेषनिधीतून देण्याची घोषणा केली आहे.

अशा योजनांमुळे गावांना चालनाच मिळणार असून गावे तंटामुक्तीकडे वाटचाल करु शकतात. भविष्यातील गरजा ओळखुन प्रत्येक गावाने गावाच्या विकासालाच प्राधान्य द्यावे आणि लोकप्रतिनिधींनी दिलेला हा निधी विकासासाठी मिळवावा, जेणे करुन गावाचा विकास करता येईल व जगापुढे बिनविरोध निवडीचा संदेशही जाईल.

60 ग्रामपंचायतीत निवडणूका

अहिवंतवाडी, कोशिंबे, खडकसुकेणे, गोळशी, गोंडेगाव, चिंचखेड, जोपुळ, देवसाने, पालखेड बंधारा, वणी खुर्द, सोनजांब, आंबाड, करंजखेड, बोपेगाव, हस्तेदुमाला, इंदोरे, गांडोळे, चाचडगाव, चौसाळे, परमोरी, पाडे, पांडाणे, वलखेड, वारे, वाघाड, अवनखेड, कुर्णोली, कोकणगाव ब्रु, कोल्हेर, जोरण, पिंप्रीअंचला, पुणेगाव, बाडगीचा पाडा, भनवड, माळेदुमाला, लोखंडेवाडी, वनारे, विळवंडी, पिंपळगाव केतकी, आंबेदिंडोरी, नाळेगाव, चंडिकापूर, दहिवी, महाजे, ओझे, मातेरेवाडी, कादवा म्हाळुंगी , फोपळवाडे, लखमापूर, मावडी, करंजाळी, तिसगाव, खेडगावं, जऊळके वणी, म्हेळूस्के, हातनोरे, शिंदवड, तिल्लोळी, तळेगांव वणी, पिंपळगाव धूम

बनविरोध निवडणूक केल्यास 1 लाख रु.

ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केल्यास 1 लाख रुपये बक्षिस पंचायत समिती सेस निधीतून देण्याची घोषणा खेडगाव गणाचे सदस्य एकनाथ खराटे यांनी केली. एकनाथ खराटे यांनी सांगितले की, गावगावात संघर्ष वाढण्यापेक्षा बिनविरोध निवड केल्यास गावाचा पर्यायाने गणाचा विकास होणार आहे. आपआपासातील मतभेद दुर होणार आहे. त्यामुळे गावच्या प्रमुख व्यक्तींनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध कशी होईल, यासाठी प्रयत्न करावे. त्यांना पंचायत समिती सेस निधीतून 1 लाख रुपये बक्षिस देण्यात येईल, असे एकनाथ खराटे यांनी सांगितले.

निवडणूका बिनविरोध करा

दिंडोरी तालुक्यात अनेक ग्रामपंचायती आहेत. या ग्रामपंचायती निवडणुका बिनविरोध करण्यासाठी जेष्ठ आणि युवकांनी एकत्रित येऊन प्रयत्न करावे असे आवाहन पंचायत समिती उपसभापती वनिता विठ्ठल अपसुंदे यांनी केले आहे.अपसुंदे यांनी सांगितले की, दिंडोरी तालुक्याची वाटचाल ही आता विकासाकडे सुरु झालेली आहे. लोकाभिमुख आणि गतीमान प्रशासन दिंडोरी पंचायत समिती देत आहे.प्रत्येक गावातील जेष्ठ सदस्यांनी थांबुन नविन युवकांना प्राधान्य दयावे,गावे स्वयंपुर्ण करण्यावर भर दयावा. बिनविरोध निवड झाल्यास विकासच होणार असल्याचे वनिता विठ्ठल अपसुदे म्हणाल्या.