संतप्त ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

संतप्त ग्रामस्थांनी शाळेला ठोकले कुलूप

मनमाड | प्रतिनिधी | Manmad

शिक्षकांच्या अपुर्‍या संख्येमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याच्या आरोप करत संतप्त झालेले पालक, सरपंच आणि ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या वंजारवाडी येथे घडली. आंदोलनात विद्यार्थीदेखील सहभागी झाले होते...

जिल्हा परिषदेच्या (Zilla Parishad) या शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत शिक्षण दिले जात असून शाळेत 230 विद्यार्थी आहेत. त्यांच्यासाठी 7 शिक्षक मंजूर असताना फक्त 3 शिक्षक देण्यात आले. वारंवार मागणी करूनदेखील अधिकारी शिक्षक देत नसल्याचे पाहून अखेर पालक, ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोको आंदोलन केले.

मनमाड पासून 5 किमी अंतरावर वंजारवाडी गाव असून येथे असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत परिसरातील शेतकरी, मजूर, गोरगरीब आणि सर्वसामान्यांचे मुले शिक्षण घेतात.

विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत नाही त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळेला शिक्षक देण्यात यावे, अशी मागणी सरपंचा, सदस्यापासून पालकांनी शिक्षण विभागसह संबधित अधिकार्‍यांना निवेदने देत केली मात्र त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले.

आज ग्रामसभा होती त्यात ही शिक्षक कमतरतेचा मुद्दा उपस्थित करण्यात आल्यानंतर शिक्षण विभागाशी संपर्क केला. मात्र नेहमीप्रमाणे उडवा उडवीचे उत्तर मिळाल्यानंतर ग्रामसभेला उपस्थित असलेल्या ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला. त्यानंतर शाळेबर जात ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले.

यावेळी सरपंच कांचन गायकवाड, उपसरपंच अनुराधा सावंत, सदस्य संतोष पवार, जन्याबाई गुंडगळ, पंकज जाधव, मच्छिंद्र जाधव, अनिल दखणे, सुभाष लभडे, गोरख गुंडगळ, शरद जाधव, प्रकाश सावंत, भागीनाथ शिंदे, नथु गुंडगळ, अर्जुन गायकवाड, संजय शिंदे, पप्पू ठाकरे, ललिता पगारे, सतीश जाधव, दत्तू जाधव आदींसह ग्रामस्थ,पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com