
सुरगाणा |प्रतिनिधी | Surgana
आज गुजरात राज्यात गावांची कृती समिती पोहोचली असून वाझदा येथील तहसीलदारांची भेट घेत त्यांना निवेदन दिले आहे. सुरगाण्यातील काही गावांच्या विलीनीकरण होण्यावर ठाम असल्याचे दिसून येत आहे...
सुरगाणा तालुक्यातील गावांचा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे. सुरगाण्यातील गावे गुजरातमध्ये विलिनीकरणाच्या मुद्दयावर ठाम आहेत. याबाबत डांग येथील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे.
नाशिक-गुजरात सीमेवर असलेल्या सुरगाणा तालुक्यात पांगरणे तसेच इतर आजूबाजूंच्या गावांनी देखील गुजरातला जाण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रश्नावर रविवारी बैठक घेत कृती समितीची स्थापना करण्यात आली असून डांग जिल्हाधिकाऱ्यांना ही कृती समिती निवेदन देणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष चिंतामण गावित यांनी दिली आहे.
सुरगाण्यातील गावे स्वातंत्र्यापासून आजपर्यंत दुर्लक्षितच आहेत. येथील 32 खाटांचा शासकीय दवाखाना तत्कालीन आमदार हरिभाऊ महाले यांच्या निधीतूण पन्नास वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. तो आजही जैसे थे आहे. तसेच दवाखान्यात अद्यापही स्त्री रोग तज्ञ नसल्याने अनेकदा गुजरात राज्यातील दवाखान्यात पाठवले जाते. अशावेळी गर्भवती स्त्रीयांची वाटेतच प्रसूती झाल्याच्या घटना घडल्या आहेत.
यासोबत पाणी, शिक्षण या सुविधाही मिळत नसल्यामुळे गुजरात राज्यात समाविष्ट होण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे, अशी माहिती चिंतामण गावित यांनी दिली आहे.