लासलगाव । Lasalgaon (वार्ताहर)

येथील कोटमगाव रस्त्यावर पिकअपच्या धडकेने वीजवाहक तार रस्त्यावर पडूनही वीजवितरणने कुठलीही कार्यवाही न केल्याने संतप्त ग्रामस्थांनी वीजवितरण कार्यालयासमोर ठिय्या मांडला. अखेर दुसर्या दिवशी वीजवितरण कडून विद्युत तारांची दुरुस्ती करण्यात आली.

येथील कोटमगाव रस्त्यावर रविवार दि.21 रोजी रात्री 11 वाजेच्या दरम्यान 407 गाडी क्र. (एम.एच. 15 सीके 756) ही महावितरण कंपनीच्या पोलवर जाऊन आदळली.त्यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. परंतु गाडीच्या धक्क्याने पोल खाली पडल्याने सर्व ओव्हरहेड वायर गाडीच्या टपावर पडली. योगायोगाने आजुबाजूला रात्रीची वेळ असल्यामुळे वर्दळ नसतांना सदर प्रकार घडला.

शिवसेनेचे निफाड तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी महावितरण कंपनीच्या कार्यालयाला कळविले परंतु सकाळी 11 वाजेपर्यंत कोणतीही दखल घेतली नाही. लासलगाव येथील नागरिकांनी हा सर्व प्रकार महावितरण कंपनीच्या कार्यालयात जाऊन सांगण्याचा प्रयत्न केला असता तेथे कोणतेही अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे सर्वांनी अधिकारी येत नाही तोपर्यंत तेथेच ठिय्या मांडला. लासलगाव, चांदवड, नाशिक येथील अधिकारी मीटिंगमध्ये तीन-तीन तास व्यस्त होते.

त्यामुळे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी अखेर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचे स्वीय सहाय्यक खरात यांना फोन केल्याने महावितरण कंपनीची यंत्रणा कामाला लागली. यावेळी अक्षय ब्रम्हेचा, मोहन आव्हाड, तुषार देवरे, नितीन मापारी, जितेंद्र दगडे, भरत दगडे, सचिन दगडे, सुरेश कुमावत, व्यंकटेश, शरद काळे, योगेश डुकरे, दीपक परदेशी, मयूर दगडे, भैय्या वाघ, नाना सूर्यवंशी, विकास जगताप, समीर माठा, लासलगाव पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सचिन शिंदे, भूषण लोढा, चिराग जोशी, भैय्या नाईक आदींसह लासलगाव, कोटमगावचे ग्रामस्थ उपस्थित होते. कोटमगाव रोड येथील महालक्ष्मी नगर, कृषी नगर, श्रीराम नगर, बालाजीनगर, दत्तनगर या भागातील वीजपुरवठा देखील खंडित झाला होता.