जिल्हा परिषदेचा 'विद्यावाहिनी रेडिओ’ उपक्रम

विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचण्यासाठी पुढील पाऊल
जिल्हा परिषदेचा 'विद्यावाहिनी रेडिओ’ उपक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

ऑनलाईन शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नयेत, यासाठी जिल्हा परिषदेने काही दिवसांपूर्वीत ‘डोनेट अ डिव्हाईस’ अशी चळवळ सुरू केली आहे. या उपक्रमास नागरिकांचा प्रतिसाद मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. या विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचण्यासाठी पुढील पाऊल म्हणून ‘विद्यावाहिनी रेडिओ’ उपक्रमास स्वातंत्र्यदिनाच्या औचित्यावर सुरुवात केली आहे. या उपक्रमाचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केला.

या उपक्रमांतर्गत इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी सकाळी ९.४० वाजता शैक्षणिक अभ्यासक्रम प्रसारीत केले जाणार आहेत. नाशिक आकाशवाणीच्या माध्यमातून जिल्हा परिषद अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मुलाखतीने या उपक्रमास सुरूवात झाली आहे. उपक्रमाचे संयोजन लीडरशीप फॉर इक्वीटी या संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

‘शाळाबाहेरची शाळा’ व ‘सेंटर फॉर लर्निंग रिसोर्स संस्था : वुई लर्न इंग्लिश’ या दोन सामाजिक संस्थांच्या सहकार्याने आकाशवाणीवरील अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. यंदा करोनामुळे शालेय शिक्षणास मोठा फटका बसला आहे. अद्यापपर्यंत नवीन शैक्षणिक वर्षात शाळांना सुरूवात होऊ शकलेली नाही. या स्थितीतही विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत रहावे, यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीने सर्वांपर्यंत शिक्षण पोहचविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. इंग्रजी , बालभारती मराठी , गणित हे विषय रेडिओ प्रसारणाव्दारे शिकविले जाणार आहेत.

शिक्षण विभागाचे आवाहन

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे जिल्ह्यात डोनेट अ डिव्हाईस ही चळवळ सुरू करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेतील ६७ टक्के विद्यार्थ्यांकडे अद्यापही मोबाईल किंवा तंत्रज्ञानाची अद्ययावत साधने उपलब्ध नाहीत. या उपक्रमांतर्गत आपला वापरात नसलेला किंवा दुरूस्तीयोग्य असणाऱ्या मोबाईलसारख्या साधनांपासून तर नवीन साधनांपर्यंत नागरिक या वस्तू विद्यार्थ्यांसाठी दान देऊ शकतात. यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

रेडिओ अभ्यासक्रमाचे वेळापत्रक

वार इयत्ता

सोमवार - तिसरी ते सातवी

मंगळवार - पहिली ते सातवी

बुधवार - तिसरी ते सातवी

गुरूवार - तिसरी ते सातवी

शुक्रवार - पहिली ते सातवी - - -

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com