
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत पंचायत समितीच्या आवारात यंदाही रानभाज्या महोत्सवाचे (Ranbhajya mahotsav) आयोजन करण्यात आले आहे. उद्या (दि.२७) सकाळी १० विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे (Radhakrishna Game) यांच्या हस्ते या महोत्सवाचे उदघाटन करण्यात येणार आहे. पुढील तीन महिने दर आठवड्याच्या शुक्रवारी हा रानभाज्या महोत्सव होणार आहे. उद्या उद्घाटन झाले की या आठवड्यातील रानभाज्या महोत्सव शुक्रवारपर्यंत सुरु राहणार आहे...
शहरी भागातील नागरिकांना रानभाज्यांची (Ranbhajya) ओळख व्हावी, या उद्देशाने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून प्रत्येक आठवड्यात रानभाज्या विक्रीस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod) यांनी दिली.
उमेद (एम.एस.आर.एल.एम) महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानामार्फत नाशिक जिल्ह्यात महिलांच्या सक्षमीकरण व जीवनोन्नतीसाठी काम करण्यात येत आहे. ग्रामीण भागातील गरिबातील गरीब महिलांचे संघटन करून त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण कशा होतील व त्यांची कायमस्वरूपी उपजीविकेत वृद्धी कशी निर्माण होईल, यावर महाराष्ट्र राज्यात व नाशिक जिल्ह्यात कार्य सुरू आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून रानभाज्या महोत्सव राबविला जातो.
आदिवासी भागातील गरीब महिला पावसाळ्यात रानात जाऊन रानभाज्या गोळा करतात. या राभाज्यांचे आरोग्यवर्धक, शक्तिवर्धक, त्रिदोषवर्धक असे अनेक फायदे आहेत. पावसाळा सुरवात झाली की, रानात, माळावर रानभाज्या उगवायला सुरवात होते. आदिवासी महिला भर पावसात जाऊन या रानभाज्या गोळा करतात.
या रानभाज्या खायला अतिशय पौष्टिक, आरोग्य वर्धक व बहुगुणी आहेत. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, सापोजेनिन, सॅपोनिन, सोडियन सोडियम पोटॅशियम, कॅल्शियम असते. या रानभाज्यांची शहरी भागातील नागरिकांना ओळख व्हावी व बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळावे या उददेशाने उमेद अभियानामार्फत रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
नाशिक पंचायत समिती आवारात तीन महिने हा रानभाज्या महोत्सव राबविण्यात येणार असून दर शुक्रवारी सकाळी १० ते दुपारी २ या कालावधीत पावसाळयातील रानभाज्या विक्रिसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे (Anandrao Pingle) यांनी दिली.
रानभाज्या महोत्सवानंतरही महिला स्वय्ंसहयता गटांना दिवाळीपर्यत येणाऱ्या विविध सणांसाठीच्या वस्तु विक्री करण्यासाठी स्टॉल्स उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
उद्घाटनाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड (Leena Bansod), जिल्हाधिकारी गंगाथरन डी. (Gangatharan D.), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक आनंदराव पिंगळे, गट विकास अधिकारी डॉ. सारिका बारी, सहाय्यक प्रकल्प अधिकारी विनोद मेढे, जिल्हा अभियान व्यवस्थापक बंडू कासार आदी उपस्थित राहणार आहेत. नाशिक शहर परिसरातील नागरिकांनी या रानभाज्या महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.