
पालखेड बं. । वार्ताहर | Palkhed
गेल्या तीन-चार दिवसापासून सोशल मीडियावर (social media) अज्ञात व्यक्तींकडून टाकण्यात आलेला पालखेड धरण (Palkhed Dam) परिसरात पट्टेरी वाघाचा (tiger) व्हिडिओ (video) हा तालुक्यात चर्चेचा विषय बनला आहे.
यामुळे नागरिकांमध्ये चर्चा बरोबर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पहाटे उठून तसेच सायंकाळी फिरणारे घराबाहेर पडणारे नागरिक, शेतकरी (farmers), शेतमजूर हे देखील आता घराबाहेर पडताना टाळाटाळ करत असल्याचे दिसत आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसापासून पालखेड व कोराटे परिसरात बिबट्या (Leopard) असल्याचे बोलले जात होते. त्यानुसार या दोन्ही गावातील शेतकर्यांच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये (CCTV camera) हे बिबटे पाहावयास मिळत आहे. मात्र त्यानंतर सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) झालेला पट्टेरी वाघाचा व्हिडिओ यामध्ये बदल करून पालखेड धरण असे टाकण्यात आले आहे.
त्यामुळे या व्हायरल झालेल्या व्हिडिओची तालुक्यात नव्हे तर जिल्हाभर चर्चा होत असून नागरिकांमध्ये शेतकर्यांमध्ये व मजूर वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत संबंधित विभागाशी चौकशी केली असता तालुका वन अधिकारी अशोक काळे (Forest Officer Ashok Kale) यांनी सांगितले की, तालुक्यामध्ये असे कुठलेही वाघ (tiger) नसल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये. या परिसरात बिबटे (Leopard) आहे हे मात्र तितकेच खरे आहे.
हा व्हिडिओ पालखेड धरण परिसरातला नाही. मुळात आपल्या परिसरामध्ये कुठेही पट्टेरी वाघ आढळून येत नाही. उत्तर महाराष्ट्रात फक्त जळगाव जिल्ह्यात पट्टेरी वाघ आहे आणि विदर्भ म्हणजेच नागपूर, चंद्रपूर, अमरावती या जिल्ह्यांमध्ये पट्टेरी वाघ दिसतो. आपल्या तालुक्यात ऊस पिकांचे क्षेत्रात बिबट्याचे अस्तित्व आहे आणि ते आढळून येतात.
असे असले तरी सोशल मीडियावर असे प्रकार सर्रास होतात. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता आपल्या येणार्या मेसेसची खात्री करावी. अशा प्रकारामुळे जनतेत अनावश्यक भीती आणि उत्सुकता निर्माण होते. सजग युवक आणि नागरिकांनी असे मेसेज टाळावे असे आवाहन वन अधिकारी अशोक काळे यांनी केले आहे.
पालखेड बंधारा धरण व परिसरात पट्टेरी वाघ असल्याचा व्हिडिओ सोशलमीडीयावर व्हायरल झाला आहे. मात्र हा व्हिडिओ पालखेड धरण परिसरातला नसल्याने नागरिकांनी शेतकर्यांनी व मजूर वर्गाने घाबरून जाऊ नये, याबाबत परिसरात पाहणी करण्यात येणार असून नागरिकांना बिबटे व पट्टेरी वाघ यामध्ये असणारा फरक याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. वाडी वस्तीवरही मार्गदर्शन करणार आहे.
- पूजा जोशी, वन अधिकारी