बिटकोतील व्हेंटिलेटर्स वापरात आणावे

दीड-दोनशे रूपयांच्या पार्टविना व्हेंटिलेटर्स बंद
बिटकोतील व्हेंटिलेटर्स वापरात आणावे
USER

नाशिकरोड । प्रतिनिधी

बिटको कोविड रुग्णालयात मंगळवारी रात्री तिसर्‍या मजल्यावरील व्हेंटिलेटर्स ओव्हरहिट होऊन शॉर्टसर्किट झाले. जाळ होऊन ते बंद पडले. त्यापाठोपाठ चार व्हेंटिलेटर्सही बंद पडले. सुदैवाने कोणतीही जिवीत हानी झाली नाही. तथापी, या व्हेन्टिलेटर्सच्या प्रश्न पुन्हा एरणीवर आला आहे. रुग्णांचा जीव वाचविणारे हे व्हेन्टिलेटर्स पाच तासाच्या वर काम करत नाही, अशा तक्रारी आहेत. धक्कादायक बाब म्हणजे अवघ्या दिडशे-दोनशे रुपयांच्या पार्टसाठी हे व्हेंटिलेटर्स बंद आहेत. रुग्णांचा जीव धोक्यात येण्याआधी महापालिकेने कार्यवाही करावी अशी मागणी होत आहे.

करोना रुग्णांना व्हेंटिलेटर्सची तीव्र गरज असल्याने केंद्र सरकारने पंतप्रधान निधीतून 60 व्हेंटिलेटर्स नाशिक महापालिकेला दिले. त्यातील 45 बिटको रुग्णालयाला मिळाले. ते तिसर्‍या मजल्यावर पडून आहेत. एक महिन्यापासून ते एका रुमध्ये ठेवलेले आहेत. त्याचे कनेक्टर आणि स्टॅबिलायझर नसल्याने ते सुरु होत नाही. हस्तांतर करतेवेळी या दोन वस्तू मिळालेल्या नाहीत. दुसरे असे की, सॉफ्टवेअरच्या समस्येमुळे हे व्हेंटीलटर्स पाच तासाच्या वर काम करत नाहीत. मंगळवारी रात्री व्हेंटिलेटर्स ओव्हरहिट होऊन बंद पडले. पाठोपाठ अन्य चारही बंद पडले. त्याचे कारण शोधल्यास यावर अधिक प्रकाश पडेल.

नोडल अधिकारी डॉ. जितेंद्र धनेश्वर व वैद्यकीय कर्मचार्‍यांनी त्वरित हालचाल करुन रुग्णांवर त्वरित उपचार केल्याने मोठी दुर्घटना टळली, जिवीतहानी झाली नाही.

संबंधित कंपनीला महापालिका प्रशासनाने पत्र लिहून खुलासा मागवावा, तक्रार नोंदवावी, अशी नागरिकांची मागणी आहे. रुग्णांचा प्राण वाचविण्यासाठी आवश्यक असलेले व्हेंटिलेटर्स इतक्या दिवसांपासून बंद असूनही कार्यवाही का झाली नाही याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. जाकीर हुसेन रुग्णालयाच्या दुर्घटनेची आठवण नागरिकांना यामुळे झाली. त्या घटनेत ऑक्सिजन प्रकल्पात गळती होऊन 24 जण महिनाभरापूर्वी दगावले होते. चार दिवसांपूर्वी नगरसेविकेच्या पतीने इनोव्हा कार थेट रुग्णालयाचा काचेचा मोठा दरवाजा तोडून आत घातल्याने खळबळ उडाली होती. त्यापाठोपाठ व्हेंटिलेटर्सची घटना घडली. त्यामुळे बिटको रुग्णालयाची साडेसाती सुरुच असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नगरसेवक जगदीश पवार यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन समस्येची माहिती घेतली. ते म्हणाले की, पंतप्रधान निधीतून आलेले व्हेंटिलेटर्स हे रुग्णांचा जीव धोक्यात असताना इतक्या दिवसांपासून बंद का पडून आहेत याची चौकशी करावी. ते तातडीने सुरु होण्याबाबत कार्यवाही करावी. चालू स्थितीत असलेल्या व्हेंटिलेटर्ससाठी ऑपरेटर आहेत का, नसतील तर कायमस्वरुपी ते त्वरित नियुक्त करावेत. रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी आयुक्तांनी कार्यवाहीचे निर्देश द्यावेत.

नगरसेवक बाजीराव भागवत यांनीही रुग्णालयाला भेट दिली. ते म्हणाले की, या व्हेंटिलेटर्सचा दर्जा चांगला आहे. 50 रुपयाच्या कनेक्टर आणि 200 रुपयांच्या स्टॅबिलायझर अभावी ते अनेक दिवसांपासून बंद असल्याचे मला समजले. मी हे साहित्य स्वतःच्या पैशातून घेऊन देणार आहे. मनपा रुग्णालयांमधील अशा यंत्रणांची देखभाल नियमित व्हावी, कायमचे तंत्रज्ञ नेमावेत या मागणीसाठी आयुक्तांना पत्र देणार आहे. याबाबत आपण वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांशी बोललो आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com