नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरात कोणीही कोठेही रस्त्यावर वाहने पार्क करून जात असल्याने एकंदर पार्किंगचा बोजवारा उडाला आहे. याच्या परिणामी शहरातील सर्व प्रमुख चौक व मार्गांवर वाहतुक कोंडीच्या समस्येने नागरिक हैराण झाले आहेत. या सर्वांवर नियंत्रणासाठी पोलीस प्रशासनाने जाहीर केलेली टोईंग व्हॅनची अद्याप प्रतिक्षा आहे.

शहरातील वाहतूक समस्या सोडवण्यासाठी तत्कालीन पोलीस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल यांनी 2018 मध्ये शहरात टोईंग व्हॅन सुरू केली होती. सुरूवातीचे काही दिवस वगळता त्यास विरोध सुरू झाला. तसेच कालांतराने नागरिकांमध्ये आणि ठेकेदाराच्या कर्मचार्यांमध्ये वाद वाढत गेले.

ठेकेदार कर्मचार्यांचा उद्धटपणा यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हा ठेकाच रद्द केला. मात्र अवघ्या तीन ते चार महिन्यात हा ठेका नव्याने देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली.

शहरात वाहतुकीची शिस्त नसल्याने तसेच पार्किंगची समस्या गंभीर असल्याने पोलिस प्रशासनाला पुन्हा टोईंग व्हॅनची मदत घ्यावी लागणार आहे. निविदा प्रक्रियेतील काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून, टोईंग व्हॅनमुळे रस्त्यावरील बेशिस्तीचे प्रमाण कमी होईल व वाहतूक व्यवस्था सुधारेल असे अनेकांचे मत आहे

शहरात सर्वच प्रमुख रस्त्यावर वाहने सर्रास पार्क होतात. यामुळे वाहतूक कोंडी होती. तसेच छोटे मोठे अपघात सुद्धा घडतात. वाहतूक पोलिसांकडून कारवाई होते. परंतु दररोज बेशिस्त वाहनांवर कारवाई करणे सुद्धा शक्य होत नाही. त्यामुळे बेशिस्तरित्या वाहने उभी करणार्यांसाठी पुन्हा टोइंग व्हॅन कार्यरत करण्याचा निर्णय पोलिस प्रशासनाने नुकताच घेतला आहे.

आता नो पार्किंग समस्या मोठी होत असून, नो पार्किंग झोन मधील दुचाकी, चारचाकी वाहने उचलण्याचा ठेका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तांत्रिक लिफाफा उघडल्यानंतर निविदापूर्व बैठक झाली. त्यानंतर आता वित्तीय लिफाफा उघडला जाणार असून यानंतर टोईंग प्रकिया प्रत्यक्ष सुरू होणार आहे.

यापुर्वी टोईंग व्हॅनमुळे काही वाद जरूर निर्माण झाले. मात्र, त्यावर तोडगा काढला तर काही अडचणी येणार नाहीत. यामुळे शहरातील विस्कळीत वाहतूक नक्कीच सुरळीत होईल, निविदा प्रक्रियेतील काही तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात येत असून, टोईंग व्हॅनमुळे रस्त्यावरील बेशिस्तीचे प्रमाण कमी होईल.

पौर्णिमा चौघुले - श्रींगी, पोलीस उपायुक्त