Vehicle seized with the suspect
Vehicle seized with the suspect|Musalgaon MIDC Police Staion
नाशिक

सिन्नर : महिलेवर अत्याचार करुन फरार झालेल्या ट्रकचालकाला बेड्या

मुसळगाव एमआयडीसी पोलीसांची औरंगाबादेत धडक कारवाई

Vilas Patil

Vilas Patil

सिन्नर | प्रतिनिधी

प्रवासी म्हणून आयशरमध्ये बसवून घेतलेल्या महिलेवर तिच्या 5 वर्षीय मुलासमोर अत्याचार करणाऱ्या आयशर चालकाला पकडण्यात मुसळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पथकाला यश आले आहे. या गुन्ह्ंयातील आयशरही पोलिसांनी जप्त केला आहे.

शिर्डी-सिन्नर महामार्गावरील पाथरे फाट्यावर सदर महिला सिन्नरला जाण्यासाठी आपल्या 5 वर्षाच्या मुलासह उभी होती. शिर्डीकडून येणाऱ्या चॉकलेटी रंगाच्या आयशर चालकाने थांबून या महिलेला सिन्नरला उतरुन देण्याच्या बहाण्याने बसवून घेतले होते. मात्र, महिलेचा डोळा लागल्याची संधी साधत चालकाने सिन्नर येवूनही महिलेला सांगितले नाही.

मोहदरी घाटाच्या पूढे गेल्यानंतर महिलेला जाग आली आणि सिन्नर मागे राहिल्याचे तिच्या लक्षात आले. तिने चालकाला आपल्याला सिन्नरला परत नेऊन सोडण्याची विनंती केली. मात्र, चालकाने पुढे जाऊन रस्त्याच्या कडेला निर्जण स्थळी आयशर थांबवून महिलेचे तोंड दाबून तिच्यावर मुलासमोरच लैंगिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (दि.12) दुपारी 3 च्या दरम्यान घडली होती.

या प्रकारानंतर चालकाने सदर महिलेसह मुलाला सिन्नर बसस्थानकाजवळ सोडून पळ काढला होता. मात्र, सदर महिलेला त्रास होऊ लागल्यानंतर शहरातील नातेवाईकांनी तिला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.

त्यानंतर पोलीसांनी अज्ञात आयशर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला होता. आयशरचा नंबर महिलेने पाहिला नव्हता. केवळ औरंगाबादहून माल भरुन नाशिकला जात असल्याचे चालकाने सांगितल्याचे ही महिला सांगत होती. त्यामूळे या चालकाचा शोध घेणे हे पोलीसांसाठी आव्हानच होते.

पोलीस अधिक्षक डॉ. आरती सिंह, अप्पर अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधिक्षक माधव रेड्डी यांनी तपासात मार्गदर्शन केल्यानंतर पोलीस निरिक्षक अशोक रहाटे यांनी शिर्डी व नाशिक महामार्गावरील काही सीसीटीव्ही फुटेज तपासले.

शिंदे येथील टोलनाक्याचेही सीसीटीव्ही फुटेज तपासून संशयीत आयशर शोधण्यात पोलीसांना यश आले. पोलीस पथकाने औरंगाबाद येथे जाऊन सापळा रचत आयशर क्र. एमएच 20 / ईएल 2346 जप्त करुन चालक प्रदिप संतोष काळे (25) रा. भाबरडा ता.जि. औरंगाबाद याला ताब्यात घेतले आहे.

पोलीस निरिक्षक रहाटे, उपनिरिक्षक गोपाळ लावणे, तुषार मरसाळे, सुदाम धुमाळ, रामचंद्र भवर, प्रतापसिंह ठाकूर, सुनिल जाधव या पथकाने ही कारवाई फत्ते केली असून अवघ्या तीन दिवसांत गुन्हेगाराला बेड्या ठोकणाऱ्या पोलीसांवर कौतूकाचा वर्षाव होत आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com