येवला बाजार आवारात यायचंय मग करोना चाचणी करून या!

समितीत वाहनांची नोंदणी सुरु; करोना चाचणी निगेटिव्ह अहवाल असलेल्यांनाच प्रवेश
येवला बाजार आवारात यायचंय मग करोना चाचणी करून या!

येवला|प्रतिनिधी

येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचे मुख्य आवार व उपबाजार अंदरसुल आवारावरील शेतीमालाचे लिलावासाठी येणार्‍या प्रत्येक शेतकरी व इतर बाजार घटक करोना चाचणी निगेटिव्ह अहवाल, व वाहनाची नोदणी असलेल्यांनाच प्रवेश देण्यात येईल अशा सुचना मुख्य प्रशासक, सचिव व सर्व प्रशासकीय संचालक मंडळ यांनी केल्या आहेत...

शुक्रवार दि.२१ रोजी जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधक यांच्या सोब़त झालेल्या बैठकीत सूचनेप्रमाणे करोना काळात बाजार समितीचे लिलाव कामकाज पूर्ववत सुरू करणेसाठी सोमवार दि.२४ रोजी मुख्य आवार येवला येथे ५०० (ट्रॅक्टर) व उप बाजार अंदरसुल येथे ३०० (ट्रॅक्टर) कांदा लिलावासाठी ( फक्त ट्रॅक्टर) वाहनांची नोंदणी रविवार दि.२३ रोजी संबंधित बाजार समिती संपर्क साधुन सकाळी ९.०० ते दुपारी ०१:०० वाजेपर्यंत करण्यांत येईल.

नोंदणी केलेल्या शेतकर्‍यांनाच सोमवारी २४ रोजी बाजार समितीच्या गेट वर नोंदणी केली असल्याची खात्री करुन सकाळी ६ वाजेनंतर बाजार समितीत प्रवेश दिला जाईल. या दिवशी सकाळी ०६ ते ९:३० मि. पर्यंत वाहन आणावे. नंतर आलेल्या वाहनांना प्रवेश दिला जाणार नाही.

मुख्य प्रवेशद्वारावरून यार्ड आवारात प्रवेश करतांना वाहना सोबत येणार्‍या व्यक्तीने किमान ७ दिवस अगोदर केलेला करोना चाचणी निगेटिव्ह अहवाल असणे बंधनकारक राहील. करोना चाचणी अहवाल नसल्यास संबधीत व्यक्तींना आवारात प्रवेश दिला जाणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी व बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे अशा सुचना व विनंती मुख्य प्रशासक, सचिव व सर्व प्रशासकीय संचालक मंडळ यांनी केली आहे.

तसेच येवला कृषि उत्पन्न बाजार समितीचे आवारात प्रवेश करतांना प्रत्येकाने तोंडाला मास्क लावणे बंानकारक असून, विनामास्क कुणीही बाजार समिती मध्ये प्रवेश करु नये. तसेच शेतकरी बांधावांनी शेतीमाल विक्रीसाठी आदल्या दिवशी बाजार समितीत मुक्कामी येऊ नये.

ज्या दिवशी लिलाव असेल त्या दिवशी सकाळनंतरच आवारात यावे. वाहनासोबत फक्त एकाच व्यक्तीस प्रवेश दिला जाणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी व व्यापारी यांनी करोना चाचणी करुन घेतली आहे. त्यांनी करोना चाचणीचा रिपोर्ट बरोबर आणावा. शेतकरी बांधवांनी बाजार समितीत आल्यानंतर वाहनामध्ये किमान ३ ते ५ ५ फुट अंतर सोडावे व वाहने रांगेत उभी करावी.

ज्या वाहनाचा लिलाव सुरु असेल त्या शेतक-यानेच वाहनाजवळ थांबावे, इतरांनी आपआपल्या वाहनाजवळ थांबावे व गर्दी करु नये, सर्वांनी सोशल डिस्टीन्सगचे पालन करावे.

त्याचप्रमाणे सर्व बाजार समिती घटकांना करोना चाचणी करुनच आवारात प्रवेश दिला जाणार असल्याने, प्रत्येकाने आपली करोना चाचणी करुन घ्यावी व शासनामार्फत तसेच स्थानिक प्रशासनामार्फत करोना महामारी संदर्भात वेळोवेळी निर्गमित होणार्‍या सुचनांचे व आदेशाचे काटेकोरपणे पालन करुन बाजार समितीस सहकार्य करावे, असे आवाहन बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार, सचिव के. आर. व्यापारे व सर्व प्रशासकीय संचालक मंडळाने केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com