देवगाव। Devgaon (प्रमोद तुपे)

देवगाव ते मानोरी फाटा या महत्त्वाच्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्याने वाहने नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. साईटपट्ट्यांनी फुटापर्यंत मजल मारल्याने समोरुन येणार्या वाहनाला साईट देणे अवघड होते.

या रस्त्यावरुन प्रवास करणार्या नागरिकांची हाडे खिळखिळी होत असून वाहनांचा खुळखुळा बनला आहे. रस्ता दुरुस्तीची मागणी अनेकवेळा करुनही संबधीत अधिकारी निवेदनाला केराची टोपली दाखवत असल्याने आता या रस्त्याची दैनावस्था फिटणार कधी असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे.

देवगाव परिसरात नगदी पीकांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. परिणामी शेतीमाल बाजार समितीत विक्रीसाठी, तसेच शालेय विद्यार्थांना व नोकर वर्गाला देवगावला येण्यासाठी मानोरी फाटा हाच मार्ग आहे. मात्र आता हा रस्ता खड्डेमय बनल्याने या मार्गावर अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे.

अवघे 3 कि. मी. चे अंतर असणारा हा रस्ता पार करण्यासाठी वीस मिनिटाचा कालावधी लागतो. रस्त्यांची रुंदी कमी होत चालली असुन रस्त्यावरील डांबर केव्हाच गायब झाले आहे. देवगाव येथे बँका, सहकारी संस्था, शाळा, महाविद्यालये, दवाखाने यासह छोटे-मोठे उद्योगधंदे व व्यापारी बाजारपेठेमुळे येथे ग्रामस्थांचा नित्याचा संपर्क.

तसेच चाकरमान्यांना याच रस्त्याने ये-जा करावी लागते. लासलगाव, विंचूर, निफाड, पिंपळगाव बसवंत, नाशिक बाजारपेठेची शेतमाल वाहतुक याच रस्त्याने होते. नागरिकांना सोयीच्या असलेल्या या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी वेळोवेळी निवेदने दिली.

प्रत्यक्ष भेटी घेतल्या मात्र काही एक उपयोग झाला नाही. सद्यस्थितीत देवगावला जोडणार्या या रस्त्याला नाल्याचे स्वरूप प्रात्प झाले असून रस्त्यावर बोरीबाभळींनी अतिक्रमण केले आहे. तसेच ठिकठिकाणी दगडगोट्यांचेच साम्राज्य दिसून येत आहे. गेल्या आठ ते नऊ वर्षांपासून या रस्त्याचे काम रखडले असल्याने त्याची झळ सर्वसामान्य नागरिकांना बसू लागली असून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत आहे.

तसेच शेतमाल बाजारपेठेत पाठविण्यासाठी अनंत अडचणी येत आहेत. खराब रस्त्यामुळे कर्मचारीही येण्याचे टाळत असल्याने तेव्हा संबेधीत विभागाने वेळीच लक्ष देवुन या रस्त्याचे नव्याने डांबरीकरण करुन साईडपट्ट्या भराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

देवगावला परिसरातील आठ ते दहा खेडेगावांचा नित्याचा संपर्क येतो. विद्यार्थी व प्रवाशी, खासगी वाहने यांच्या नेहमीच्या वर्दळामुळे हा मार्ग नेहमी गजबजलेला असतो. मात्र देवगाव ते मानोरी फाटा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य वाढले असून काटेरी झुडपांनी रस्त्याला वेढा दिला आहे. रस्त्यांवर वाढते खड्ड्यांचे साम्राज्य बघता वाहन चालविणे अवघड झाले आहे. शेतीमाल काढणे कठीण झाले असून तेव्हा संबंधीतांनी या रस्त्यांची पाहणी करुन देवगाव ते मानोरी फाटा हा रस्ता डांबरीकरण करुन द्यावा.
भास्कर बोचरे, शेतकरी (देवगाव)

देवगाव ते मानोरी फाटा या 3 किलोमीटर असलेल्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्डयांमुळे छोट्या-मोठया अपघातांना सामोरे जाण्याची वेळ नागरिकांवर तसेच वाहनचालकांवर येत आहे. तसेच या खराब रस्त्यामुळे वाहनांचा बिघाड होणे, वाहने पंक्चर होणे आदी समस्यांना सामोरे जावे लागते. त्यामुळे संबंधीत अधिकारी, पदाधिकारी यांनी या रस्त्याकडे वेळीच लक्ष देवून या रस्त्याची दुरुस्ती करावी.
कृष्णा पिंगट, वाहनचालक (देवगाव)