टोमॅटोची लाली अन मिरचीचा ठसका वाढला

उत्पादन घटल्याने भावात तेजी; विदेशात मागणी
टोमॅटोची लाली अन मिरचीचा ठसका वाढला

निफाड। प्रतिनिधी Niphad

गेल्या महिनाभरापूर्वी 30 ते 40 रुपये प्रती क्रेटस् प्रमाणे विक्री होणार्‍या टोमॅटोला (Tomato) आता चांगलीच लाली चढल्याने निर्यातक्षम टोमॅटो (Exportable tomatoes) 400 तर लोकल टोमॅटो 300 रु. प्रती क्रेटस्प्रमाणे विक्री होऊ लागले आहेत. तर अवघी तीन रुपये किलोप्रमाणे विक्री होणार्‍या मिरचीचा (Chili) ठसका देखील वाढल्याने ही मिरची 20 रु. किलोप्रमाणे विक्री होवू लागली आहे. घटती आवक व वाढती मागणी यामुळे बाजारभावात वाढ (Increase in market price) झाल्याचे बोलले जात आहे.

मागील वर्षी टोमॅटोला बाजारभाव मिळाल्याने शेतकर्‍यांनी (Farmers) टोमॅटो लागवडीला सर्वाधिक पसंती दिली. परिणामी यावर्षी सुरुवातीलाच बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात टोमॅटो आवक वाढल्याने टोमॅटो अवघे 30 ते 40 रुपये प्रती क्रेटस् प्रमाणे विक्री होऊ लागले. साहजिक हेच टोमॅटो बाजारपेठेत विक्रीसाठी नेण्याचा खर्च देखील फिटत नसल्याने अनेकांनी उभ्या टोमॅटो पिकात नांगर फिरविला.

अनेकांनी रस्त्यावरच टोमॅटो फेकले. त्यातच गत 15 दिवसांपूर्वी सलग आठ दिवस पाऊस बरसल्याने टोमॅटोची पानगळ झाली. साहजिकच उत्पादनात मोठी घट झाली. त्याचा थेट परिणाम टोमॅटो बाजारभाव वाढण्यावर झाला. आज बाजारपेठेत निर्यातक्षम टोमॅटो 400 रु. तर लोकल टोमॅटो 300 रु. प्रती क्रेटस् ने विकले जावू लागले असून हे भाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

हिरवी मिरचीची देखील अशीच काहिशी अवस्था झाली. प्रारंभी 3 रु. किलोप्रमाणे विक्री होणार्‍या मिरचीचे अती पावसामुळे उत्पादन घटले. साहजिकच बाजारभावात वाढ होत असून आज हिरवी मिरची 20 रु. किलोप्रमाणे विक्री होवू लागली आहे. तर 4 रु. किलोप्रमाणे विक्री होणारी सिमला मिरची 350 रु. प्रती क्रेटस्ने विक्री होऊ लागली आहे. टोमॅटो, हिरवी मिरची, सिमला सह भाजीपाल्यास दुबई (Dubai) व आखाती देशात मागणी वाढल्याने या फळभाज्या व पालेभाज्याचे भावात वाढ झाल्याचे बोलले जात आहे.

टोमॅटो प्रमाणेच उन्हाळ कांद्याच्या (Summer onions) भावात देखील हळुहळू वाढ होऊ लागली आहे. निफाड तालुक्याच्या (Niphad Taluka) उत्तर भागातील शेतकरी भाजीपाला (Vegetable) पिकाला सर्वाधिक पसंती देत असतात. मात्र यावर्षी अती पावसामुळे या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

साहजिकच जेव्हा आवक घटते तेव्हा भाव वाढतात हा निसर्ग नियम आहे. आत्ताही त्याचीच पुनरावृत्ती झाल्याने टोमॅटोला चांगलीच लाली चढू लागली. तर हिरव्या मिरचीचा ठसका देखील वाढला आहे. मागील महिन्यात तोट्यात विक्री झालेले टोमॅटो, मिरची आता सध्याच्या बाजारभावात उत्पादन खर्च भरून काढतील अशी अपेक्षा आहे. परंतु आता लागवडीच्या तुलनेत उत्पादन निघण्याचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे तालुक्याच्या प्रमुख बाजारपेठेत भाजीपाला भाव खाऊ लागला आहे.

परदेशी बाजारपेठेत मागणी वाढली

सध्या इराण (Iran) मध्ये टोमॅटो हंगाम संपला असून दिल्ली, उत्तराखंड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, दुबई, ओमान, बांगलादेशासह आखाती देशात टोमॅटोला मागणी वाढली आहे. तर गुजरात, मुंबई सह शहरी बाजारपेठेत सिमला, हिरवी मिरची व पालेभाज्यांना मागणी वाढली. मात्र त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने या पालेभाज्याचे दरात वाढ झाली आहे. भाववाढीला काही प्रमाणात सतत आठ दिवस बरसलेला पाऊस कारणीभूत ठरला असून या भावाने निदान उत्पादन खर्च फिटण्यास हातभार लागेल अशी अपेक्षा आहे. सध्या लासलगाव, पिंपळगाव व खानगाव नजिक बाजार आवारावर टोमॅटो, मिरची व भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यातच देशांतर्गत व परदेशी बाजारपेठेत या भाजीपाल्याला मागणी वाढल्याने बाजारभावात सातत्याने वाढ होऊ लागली आहे.

Related Stories

No stories found.