भाजीपाला कडाडला; शेतकरी मात्र निराश

भाजीपाला कडाडला; शेतकरी मात्र निराश

मनमाड । बब्बू शेख | Manmad

पेट्रोल (Petrol,), डिझेल (diesel), गॅस (gas) पाठोपाठ आता भाजीपाला (Vegetables) देखील महाग झाला आहे. कोथंबीर वगळता इतर सर्वच भाजीपाल्याने प्रति किलो शंभरी गाठली असून मांस (Meat), मच्छी (fish), मटण, तेल, डाळी यांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढले आहे या दरवाढीचा (Inflation) फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत असल्याने त्यांचे आर्थिक बजेट पुर्णत: कोलमडले आहे.

दोन महिन्यांपूर्वी भाजीपाल्याचे दर खुपच कमी झाल्याने भाजीपाला रस्त्यावर फेकून देण्याची वेळ शेतकर्‍यांवर (farmer) आली होती. आता मालाला भाव चांगला मिळतोय मात्र बदलत्या हवामानाचा (Climate change) फटका पिकांना बसून उत्पादनात मोठी घट झाली असल्याने भाव वाढ होऊन देखील पदरी निराशाच असल्याची खंत भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांनी व्यक्त केली.

सध्या पेट्रोल आणि डिझेलने शंभरी पार केली असून घरगुती गॅस सिलेंडरच्या (Domestic gas cylinder) किमतीतही मोठी वाढ झाली आहे. मटणाचे भाव प्रती किलो 520 रुपये तर कोंबडीच्या मटनाचे भाव देखील प्रती किलो 200 रुपयांच्या उंबरठ्यावर आले आहे. वाढत्या महागाईचा सर्वात जास्त फटका हा गोरगरीब, मजूर आणि रोज कमवून खाणार्‍यांना बसू लागला आहे. वेगाने महागाई वाढत असतांना कमाई मात्र वाढत नसल्यामुळे अनेकांना जीवन जगणे कठीण झाले आहे.

गोरगरीब व मजुरांपासून मध्यमवर्गीयांपर्यंत भाजीपाला एकमेव स्वस्त होता मात्र इतर जीवनावश्यक वस्तूंच्या (Essentials) किमती सोबत आता भाजीपाला देखील महागला आहे. त्यामुळे खावे तरी काय? असा प्रश्न त्यांना पडला आहे. यावर्षी अतिवृष्टी झाली असल्यामुळे त्याचा फटका इतर पिकांसोबत भाजीपाल्यावर देखील मोठ्या प्रमाणात बसला असून एकरी उत्पन्नात सुमारे 60 ते 65 टक्के घट झाली आहे. त्यामुळे आवक कमी तर मागणी जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे भावात वाढ झाली असल्याचे व्यापार्‍यांनी सांगितले तर भाजीपाल्याच्या भावात वाढ होऊन देखील उत्पादनात घट झाली असल्यामुळे पिकावर केलेला खर्च देखील निघत नसल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे आहे.

किरकोळ बाजारात वांगी-100 ते 129 रु., गवार-110 ते 115 रुपये, शेवगा-125 ते 135 रु., वाल शेंग-80 ते 90 रु., कारले-70 ते 75 रु., टोमॅटो-40 ते 50 रु., फ्लॉवर-100 ते 110 रु., कोबी-75 ते 80 रु., भेंडी-100 ते 110 रु., सिमला मिरची-60 ते 70 रु., मेथी-25 ते 30 रु. जुडी, कोथंबीर-5 ते 7 रु.जुडी या दराने विकली जात आहे.

दिवसेंदिवस वाढत्या महागाईमुळे जीवन जगणे कठीण झाले आहे. उत्पन्न कमी तर खर्च जास्त अशी परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे काटकसर करावी लागत आहे. घराचे पुर्ण बजेट महागाईमुळे कोलमडून पडले आहे. केंद्र व राज्य शासनाने महागाईवर अंकुश लावून दिलासा देण्याची गरज आहे.

अनिता चव्हाण, गृहिणी

भाजीपाल्याच्या भावात वाढ झाल्याची ओरड केली जात असली तरी आम्हाला या दर वाढीचा कोणताही फायदा होत नाही. अगोदर खते, बी-बियाणे यांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढल्या असून मजुरी देखील वाढली आहे त्यात अवकाळी, अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली एकरी फक्त 20 ते 25 टक्केच उत्पन्न निघत आहे त्यामुळे पिकांवर केलेला खर्च देखील निघत नसल्याने भाव वाढ होऊन देखील आमच्या पदरी काहीच पडत नाही.

कानो पवार, शेतकरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com