वावी येथील विद्यार्थिनीचा रशियात मृत्यू
वावी

वावी येथील विद्यार्थिनीचा रशियात मृत्यू

दुशिंगवाडी येथील रहिवासी

सिन्नर । Sinner

वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी गेल्या तीन वर्षांपासून रशियात वास्तव्य असणाऱ्या तालुक्यातील वावी येथील २१ वर्षीय तरुणीचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१४) रात्री उशिरा घडली .

याबाबतची माहिती आज सकाळी समजल्यावर कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. अश्विनी राजेंद्र गोराणे असे या तरुणीचे नाव असून तिचे कुटुंबीय वावी जवळच्या दुशिंगवाडी येथील रहिवासी आहेत. तिचे वडील वावी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅब टेक्निशियन या पदावर कार्यरत आहेत. नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर अश्विनीने २०१७ मध्ये रशियातील तंबोव स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी ऑफ रशियन फेडरेशन या विद्यापीठात एमबीबीएसच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता.

तेव्हापासून ती तेथेच वास्तव्य करत होती. बारावीला चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाल्यानंतर तिची वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी रशियात निवड झाली होती. मंगळवारी रात्री साडे आठ वाजेपर्यंत ही आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती. नेहमीप्रमाणे घरच्यांची फोनवर बोलणे झाल्यानंतर अभ्यासाला बसते असे सांगून अश्विनीने फोन बंद केल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. मात्र, आज सकाळी सात वाजेच्या सुमारास संबंधित रशियन विद्यापीठाच्या मुंबई येथील मध्यास्थाला फोन आला व त्याने विद्यापीठाच्या कॅम्पस परिसरात मैत्रिणींसोबत फिरत असताना सेल्फी घेताना पाण्यात पडून अश्विनीचा मृत्यू झाल्याचे सांगितले.

हा निरोप मिळाल्यावर कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मुंबई येथील मध्यस्थामार्फत रशियातील विद्यापीठात संपर्क साधण्याचा आला असून कायदेशीर सोपस्कार झाल्यानंतर तिचा मृतदेह भारतात पाठवला जाईल असे विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com