शहरात विविध शासकीय कार्यक्रम

मुख्यमंत्र्यांची ऑनलाइन उपस्थिती
शहरात विविध शासकीय कार्यक्रम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आज (दि.24) महाराष्ट्र पोलीस अकादमीतील ( MPA )प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 119 व्या सत्राचा दीक्षांत संचलन, गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटन व मातोश्री मुलींचे वसतिगृह लोकार्पण सोहळा अशा विविध शासकीय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन तर उपमुख्यमंत्री अजित पवार व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्यासह मान्यवर प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत.

महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या 119 व्या सत्राचा दीक्षांत संचालनाचा कार्यक्रम सकाळी 8 वाजता पोलीस अकादमीतील मुख्य कवायत मैदान येथे होणार आहे. सकाळी 9:45 वाजता गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या नवीन इमारतीचे उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. त्यानंतर सकाळी 11:00 वाजता स्व. यशवंतराव चव्हाण जन्मशताब्दी वर्ष योजनेअंतर्गत मातोश्री या मुलींच्या वसतिगृहाचा लोकार्पण सोहळा होणार आहे.

या कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाइन तर उपमुख्यमंत्री अजित पवार, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, गृह राज्यमंत्री शहरे सतेज पाटील, गृह राज्यमंत्री ग्रामीण शंभुराज देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

Related Stories

No stories found.